Weather Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा परिणाम, थंडी ओसरणार की वाढणार?
सध्या थंडीची लाट उत्तर भारतासह देशातील अनेक भागांमध्ये कायम आहे. राजधानी दिल्लीत या हिवाळ्यातील आतापर्यंतची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून, काश्मीर खोऱ्यात काही ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेलाय. त्यामुळे नागरिक कडाक्याचा गारठा अनुभवत आहेत. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात मोठे बदल होणार आहेत. महाराष्ट्रावर नेमका कसा परिणाम होणार, पाहूया हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार रविवार, 11 जानेवारी 2026 रोजी राज्यातील वातावरणात बदल होणार आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील हवामान घडामोडींचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवत असून, विविध भागांमध्ये हवामानात चढउतार जाणवू शकतो.
राज्यात हवामान बदलणार ?
उत्तर भारतात थंडीचा जोर वाढलेला असला, तरी महाराष्ट्रात सध्या ढगाळ हवामानामुळे तापमानात किंचित वाढ होताना दिसत आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय नसल्यामुळे राज्यात अपेक्षित अशी शीतलहर अद्याप दाखल झालेली नाही. मुंबईत सकाळी हलकी थंडी जाणवत असली, तरी संपूर्ण जानेवारी महिन्यात गारठ्याचे वातावरण कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
ढगाळ वातावरणामुळे थंडी ओसरणार
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार ढगाळ वातावरणामुळे आज राज्यातील काही भागांत थंडीचा कडाका कमी होऊ शकतो. काही ठिकाणी धुके आणि दव पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश महाराष्ट्रात तापमानात चढउतार होण्याची शक्यता आहे.
कोकण - मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काय स्थिती?
सुट्टीचा दिवस असल्याने फिरायला जाणाऱ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे. कोकण-गोवा किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगांनी व्यापलेलं राहण्याचा अंदाज आहे. श्रीलंकेजवळ बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेत ओलावा वाढला असून, त्यामुळे अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. जरी पावसाची शक्यता नसली तरी ढगाळ वातावरणामुळे दिवसा जाणवणाऱ्या उष्णतेत किंचित घट होऊ शकते. परिणामी, काही भागांमध्ये दिवसाही कडाक्याच्या थंडीची शक्यता आहे.
धुळे सर्वात थंड, किमान तापमान 8.5 अंश
राज्यात सध्या धुळे येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून किमान तापमान 8.5 अंश सेल्सिअस इतके आहे. जळगावमध्ये 9.2 अंश, तर भंडारा येथे 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत गारठ्याची जाणीव अधिक होत आहे.
