Harshvardhan Sapkal : काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणूक लढणार? हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
वंचित बहुजन आघाडीबरोबर राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी करण्याचे निर्णय स्थानिक नेतृत्वांकडे दिले होते तसेच अधिकार वंचितनेही दिले होते. अनेकांची इच्छा वंचित व काँग्रेसची आघाडी व्हावी अशी आहे आणि त्यादृष्टीने दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा चांगला संवाद आणि प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडमंडळाची बैठक टिळक भवन, दादर येथे संपन्न झाली.
या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, बी.एम. संदीप, माजी मंत्री यशोमती ठाकूर, प्रफुल्ल गुडधे पाटील, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे उपनेते अमिन पटेल, माजी मंत्री रणजित कांबळे, सुनिल देशमुख, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, अतुल लोंढे यांच्यासह राज्य निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी हर्षवर्धवन सपकाळ म्हणाले की, महानगरपालिकेच्या निवडणुका १५ तारखेला जाहीर झाल्या आणि त्यावेळसच नियोजनासाठी काँग्रेस पक्षाची बैठक झाली होती, निवडणुक व्यवस्थापन व उमेदवार निश्चित करण्यासाठी यावेळी रणनिती ठरवली होती. २८ महानगरपालिकांसाठी राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली, जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या शिफारसी लक्षात घेऊन पक्ष पातळीवर एक महत्वाचा टप्पा पार पडला आहे. सोशल इंजिनिअरिंग लक्षात घेऊन तिकिट वाटपाची चर्चा करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचा घटक पक्ष नात्याने चर्चा सुरु आहे. तशा सुचना संघटनेच्या नेत्यांना दिल्या आहेत, पक्षाचा आघाडीसाठी याशिवाय कोणत्याही प्रस्ताव आलेला नाही, तसा प्रस्ताव आला तर विचार केला जाईल. एका प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, मुंबई महापालिकेतील आघाडीच्या चर्चेचा मी भाग नाही पण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकेटश वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा करत आहेत, यासाठी तिघांकडे पक्षाने संवादाची जबाबदारी सोपवलेली आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
