Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार यांचं मोठं भाष्य

Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार यांचं मोठं भाष्य

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणातच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रचंड वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणातच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रचंड वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर नेतृत्व, सत्ता आणि पक्षाच्या भविष्यातील दिशेबाबत चर्चा सुरू झाल्या असून, याच पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

AjitPawarकाल राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे वर्षा निवासस्थानी पोहोचले होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सव्वातास चर्चा केली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले. दरम्यान, आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली असून, या निर्णयाबाबतही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत मोठं भाष्य केलं. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. “हा त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आज सकाळी माध्यमांतूनच हा विषय समजला,” असं सांगत शरद पवार यांनी या घडामोडींविषयी अलिप्त भूमिका घेतली.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांबाबत शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. “या चर्चेत मी थेट सहभागी नव्हतो, मात्र विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती,” असं शरद पवार म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय १२ तारखेला जाहीर होणार होता, अशी महत्त्वाची माहितीही त्यांनी दिली.

महापालिका निवडणुकीनंतर हा निर्णय घेण्याचा विचार होता. तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकाच चिन्हावर, म्हणजेच घड्याळ चिन्हावर लढाव्यात, अशी अजितदादांची इच्छा होती, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर या चर्चांना खंड पडल्याचं त्यांनी मान्य केलं.

“दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, अशी अजितदादांची इच्छा होती आणि आमचीही होती. दोन्ही पक्षांमध्ये सुसंवाद राहावा यासाठी सकारात्मक चर्चा सुरू होती. आता याबाबतचा अंतिम निर्णय दोन्ही बाजूंचे नेते करतील,” असं स्पष्ट करत शरद पवार यांनी भविष्यातील शक्यता खुल्या ठेवल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com