Thane Crime News : ठाणे कुटुंब न्यायालयाच्या आवारात महिलेवर दोघांचा सामूहिक अत्याचार
ठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेवर सामूहिक अत्याचार (Thane Crime News) ठाणे कुटुंब न्यायालयाच्या आवारात झाल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिलेवर दोघांनी कारमध्ये सामूहिक अत्याचार केला. ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये सामूहिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
एका महिलेवर ठाणे कुटुंब न्यायालयाच्या आवारात दोघांकडून सामूहिक अत्याचार करण्यात आला. गुंगीचे औषध केकमध्ये देऊन अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चार चाकी वाहनात कुटुंब न्यायालयाच्या आवारात हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी सामूहिक अत्याचार केला. हिरालाल केदार या आरोपीला अटक करण्यात आली असून रवी पवार हा फरार आहे. 25 ऑगस्ट रोजी ही घटना घडली पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ठाणे नगर पोलीस ठाण्यात 5 डिसेंबरला महिलेने तक्रार दाखल केली.
मालेगावमध्येही धक्कादायक घटना
मालेगावात 13 वर्षीय मतिमंद मुलीवर एका 55 वर्षाच्या संशयित आरोपीकडून अत्याचार करण्यात आल्याची निंदनीय घटना घडल्याने मालेगाव पुन्हा एकदा हादरले आहे. दिपक धनराज छाजेड या संशयित आरोपीने मालेगाव येथील पीडित मुलीला फूस लावून त्याच्या स्कुटीवर बसवून एका पडीत जागेवर नेत तिच्यावर अत्याचार केले. पोलिस ठाण्यात अत्याचार व पोस्को अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्याची आज न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली असून त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

