Baba Siddique Murder Case : मोस्ट वॉन्टेड आरोपी झिशान अख्तरला अटक; पंजाबमध्ये भाजपा नेत्याच्या घरावर स्फोट घडवण्याचा कट उधळला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या खळबळजनक प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आरोपी झिशान अख्तरला अखेर अटक करण्यात आली आहे. पंजाबमध्ये भाजपा नेते मनोरंजन कालिया यांच्या घरावर स्फोट घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन संशयितांना अटक केली असता, या दोघांपैकी एक म्हणजे झिशान अख्तर असल्याचे निष्पन्न झाले.
झिशान अख्तरचा ‘डबल कनेक्शन’ – हत्या आणि स्फोट दोन्हीत सहभाग
पंजाब पोलिसांनी जालंधरमध्ये भाजपा नेते कालिया यांच्या घरासमोर स्फोट घडवण्याचा कट उधळून लावत झिशान अख्तर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. तपासात उघडकीस आले की, झिशान हा केवळ या स्फोट प्रकरणातच नव्हे, तर १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या बाबा सिद्दिकी प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झिशान अख्तर आणि शुभम लोणकर हे दोघे मिळून हत्येच्या योजनेमागे होते. त्यांनीच आपल्या गँगमधील सदस्यांना सुचना दिल्या आणि हत्येचे संपूर्ण नियोजन केले. झिशानला अटक होण्याआधी अनेक महिने मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते.
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी बाबा सिद्दिकी यांच्यावर खेरवाडी सिग्नलजवळ भरदिवसा गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्या पोटात आणि छातीवर गोळ्या लागल्या होत्या. गंभीर अवस्थेत त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत खालील आरोपींना अटक केली आहे.
हरीश कुमार – रहिवासी बहराइच, उत्तर प्रदेश
गुरमेल बलजित सिंग – रहिवासी कैथल, हरियाणा
धर्मराज कश्यप – रहिवासी बहराइच, उत्तर प्रदेश
प्रवीण लोणकर – रहिवासी पुणे, महाराष्ट्र
आता झिशान अख्तर अटकेत आल्याने प्रकरणातील तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.
पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पंजाब पोलिसांनी झिशान अख्तरची ओळख पटवल्यानंतर तात्काळ त्याला ताब्यात घेतले असून, मुंबई पोलिसांशी समन्वय साधला जात आहे. झिशानच्या अटकेनंतर त्याच्या इतर गुन्हेगारी कृत्यांचा तपास सुरू आहे आणि इतर फरार आरोपींवरही लवकरच कारवाई होणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.