Sanjay Raut Health : राऊतांची प्रकृती खालावली, महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर
मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेतला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे संजय राऊत यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता थेट नवीन वर्षात सार्वजनिक जीवनात पुनरागमन करतील. याचपार्श्वभूमिवर महायुतीतील नेत्यांकडून त्यांना लवकरात लवकर बरे होण्याचा शुभेच्छा दिल्या जात आहेत तसेच त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे.
यावेळी भाजपचे नेते जयकुमार गोरे म्हणाले की, "शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बहुतेक दोन महिन्यासाठी खोटं बोलायचं नाही असं त्यांनी ठरवलं असेल. त्यानी मौन व्रत धारण केले असेल असा खरमरीत टोला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. मत चोरीच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्यांची मती चोरीला गेली आहे".
"आपल्या पराभवाचे कारण शोधून त्याच्यावर मार्ग काढण्यापेक्षा वेगळी कारण शोधायचे आणि एक फेक नरेटीव सेट करण्याचं काम सुरू आहे. या मोर्चाने काहीही फायदा होणार नाही. कारण जनतेला माहिती आहे आपण कोणाला मतदान केलं आहे. एकाही मतदाराने अद्याप माझे मत चोरीला गेले असा दावा केला नाही".
तसेच शिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आज छत्रपती संभाजी नगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत राजकीय नेत्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर उपरोधात्मक टोला लगावला आहे. "संजय राऊत यांची प्रकृती बिघडणे हे दुर्दैवी आहे त्यांना चांगला आरोग्य मिळावं... संजय राऊत आजारी असतील तर ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी आमची प्रार्थना आहे मात्र हे दुखणं राजकीय नसावं".
"संजय राऊत मुळे पक्षाला बळ मिळतं हे डोक्यातून काढून टाका... संजय राऊत मोर्चात नसतील त्यामुळे मोर्चावर परिणाम होईल असं नाही बाकी इतर महाविकास आघाडीचे नेते असणार आहे. संजय राऊत मागे बसून देखील मोर्चाला दिशा देऊ शकतात एवढे ते मोठे आहेत", संजय शिरसाट यांचा संजय राऊत यांना उपरोधात्मक टोला लगावला.


