Navneet Rana : 'पक्षाची मान्यता रद्द करून ओवैसींना पाकिस्तानत टाका'.. नवनीत राणांचा ओवेसींना प्रतिउत्तर..
एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, माजी खासदार नवनीत राणा यांनी ओवेसींवर जोरदार टीका केली आहे. लोकसंख्या वाढीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे.काल अमरावती दौऱ्यावर असताना असुद्दीन ओवेसी यांनी नवनीत राणा यांच्या “चार मुलं जन्माला घाला” या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना, “चार नाही तर आठ करा, आम्हाला काय करायचं?” असे विधान केले होते. ओवेसींच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत नवनीत राणा यांनी थेट एमआयएम आणि ओवेसींवर निशाणा साधला.
नवनीत राणा म्हणाल्या, “या देशात लोकशाही म्हणजे काय, संविधान म्हणजे काय, यावर ओवेसींनी बोलायला हवं. लोकशाही बदलत चालली आहे असं म्हणायचं, पण स्वतः मात्र संविधानालाच मान्य न करायचं, हे चालणार नाही.” ओवेसी हे संसद सदस्य असूनही संविधानाचा सन्मान करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.नवनीत राणा पुढे म्हणाल्या, “या देशात राहायचं असेल तर संविधानाला मान्य करावंच लागेल. भारत माता की जय, वंदे मातरम म्हणायला जर कोणी तयार नसेल, तर मग ते या देशाला काय मानतात, हा प्रश्न आहे.” त्यांनी ओवेसी यांच्या राष्ट्रनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
एमआयएम पक्षावरही टीका करताना नवनीत राणा म्हणाल्या की, “एमआयएमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या पक्षाची मान्यता रद्द करावी. अशा विचारसरणीला लोकशाहीत जागा नाही.” त्यांनी यावेळी अत्यंत आक्रमक भूमिका घेत थेट ओवेसींचं नागरिकत्व रद्द करून त्यांना पाकिस्तानला पाठवावं, असं वादग्रस्त विधान केलं. “तिथे जाऊन दहा नाही तर वीस मुलं जन्माला घाला,” असा टोमणाही त्यांनी लगावला.
नवनीत राणा यांनी ओवेसींवर आरोप केला की, “तुमच्या मनात काय विचार चालले आहेत, हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्ही संसद सदस्य आहात, त्यामुळे लोकशाही आणि संविधानावर बोला. पण तुम्ही संविधान मानत नाही, देशप्रेमाचे घोषवाक्य देत नाही, मग तुम्ही या देशाशी नातं कसं जोडता?”दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून, येत्या काळात या वक्तव्यांवरून मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
