लॉकडाऊन नाही…पण मुंबईकरांसाठी नवीन कडक नियमावली
मुंबईत वाढती रुग्णसंख्या पाहता, शहर लॉकडाऊनच्या दिशने वळतेय की काय अशीच सर्वांना भीती सतावत होती. मात्र आता लॉकडाऊन तर लागले नाही आहे पण मुंबईकरांसाठी कोरोना संदर्भात नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी ही माहिती दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोना संदर्भात नवीन नियमावली जारी केली आहे. या नवीन नियमानुसार जर एखाद्या इमारतीत 5 किंवा त्याहून अधिक कोविड रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येणार असल्याची माहिती इक्बाल चहल यांनी दिली. तसेच घरात अलगीकरणात ठेवण्यात येणाऱ्या नागरिकांच्या हातावर शिक्का मारण्यात येणार आहे. लग्न समारंभ, क्लब आणि रेस्टॉरंट्स इत्यादी ठिकाणी नियमांचे पालन होतेय की नाही हे तपासण्यासाठी छापे टाकले जाणार आहेत.
'ब्राझीलहून परत आलेल्या नागरिकांना संस्थात्मक अलग ठेवण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळतात त्या ठिकाणी चाचण्या वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे चहल यांनी सांगितले.
300 मार्शल तैनात'
नवीन नियमानुसार आता सार्वजनिक स्थळी मास्क व सोशल डीस्टन्सिंग नियमांचे पालन करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी 300 मार्शल रस्त्यावर उतरवले जाणार आहेत. जो व्यक्ती नियमांचे पालन करत नसेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच फेस मास्कशिवाय लोकल गाड्यांमध्ये प्रवास करता येणार नाही आहे.