मराठी चित्रपट सृष्टीला सुवर्ण दिवस दाखवणारा सोंगाड्या
मराठी चित्रपट सृष्टीचा बादशहा अशी ओळख असणारे हरहुन्नरी कलाकार म्हणजेच दादा कोंडके. एकेकाळी डबघाईला आलेल्या मराठी चित्रपट सृष्टीला परत सुवर्ण दिवस दाखवणारा कलाकार म्हणजेच दादा कोंडके. जाणून घेऊया या हरहुन्नरी कलाकाराबद्दल…
सुरुवातीचे जीवन
दादा कोंडके यांचे मूळ नाव कृष्णा कोंडके. दादांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील हे मिलमध्ये कामगार होते. त्यांचे बालपण लालबाग जवळच्या नायगाव येथे गेले.मुळगाव हे भोर तालुक्यातील इंगवली हे गाव. कुटुंबाला हातभार लावण्याच्या दादांनी बँड पथकामध्ये सहभाग घेतला होता. बँड पथकमध्ये कार्यरत असताना समाजसेवेमधे सुद्धा भाग घ्यायला सुरुवात केली.
मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण
भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सोंगाड्या या चित्रपटाने दादांना यशाच्या शिखरावर विराजमान केले. सोंगाड्याने मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन विनोदी अभिनेता मिळाला.
दादा आणि बाळासाहेब ठाकरे
कोहिनूर चित्रपटाच्या मालकाने दादांचा सोंगाड्या हा सिनेमा रोखून धरला होता. त्यांना देव आनंद यांचा "तेरे मेरे सपने" हा चित्रपट प्रदर्शित करायचा होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दादांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे धाव घेतली.बाळासाहेबांच्या आदेशामुळे सोंगाड्या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. बाळासाहेबांचे हे उपकार दादा कधीही विसरले नाहीत आणि शेवटपर्यंत ते कट्टर शिवसैनिक राहिले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
दादांचे सलग नऊ चित्रपट हे पंचवीस आठवडे सुपरहिट ठरले होते त्यामुळे दादांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला होता. एवढे चित्रपट सलग सुपरहिट होणे हे चित्रपट सृष्टीतील एक नवीन रेकॉर्ड होते जे आजही अबाधित आहे. ते एक कसलेले अभिनेते सुद्धा होते. गाणी सुद्धा त्यांनी गायली. ते गीतकार आणि पटकथाकार सुद्धा होते. ते एक यशस्वी दिग्दर्शक आणि नावाजलेले संगीतकार देखील होते. एकाच व्यक्तीकडे एवढे गुण असणे म्हणजे आश्चर्यच नव्हे काय! द्विअर्थी विनोदाने गाजलेल्या चित्रपटात मध्ये सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव,आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, मुका घ्या मुका, मला घेऊन चला, पळवा पळवी या चित्रपटांची आवर्जून नावे घेता येतील.
विवाह आणि प्रेम
दादांचा विवाह नलिनी यांच्या बरोबर झाला होता पण तो फार काळ टिकला नाही आणि लवकरच अंतर्गत वादाने त्याचे परिवर्तन घटस्फोटात झाले. दादा कोंडके यांच्या बऱ्याच चित्रपटातील अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याबरोबर दादांचे प्रेम संबंध असल्याच्या चर्चांना उत आला होता पण याची पुष्टी दादांनी कधीच केली नाही. दादांच्या घटस्फोटानंतर दादा आणि उषा चव्हाण हे लग्न करणार असल्याच्या अफवा सुद्धा पसरत होत्या पण शेवटपर्यंत त्या अफवाच राहिल्या.
जगाचा निरोप
14 मार्च 1998 रोजी चा तो काळा दिवस उजाडला आणि दादर येथील आपल्या रामनिवास निवासस्थाने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली होती आणि नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून नेले.आजही दादांच्या चित्रपटातील गाणी ऐकताना त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्याएवढा अष्टपैलू अभिनेता आजवर तरी कोणी झाला नाही. या कसलेल्या अभिनेत्याला मानाचा मुजरा.