International Women Day : दादासाहेब फाळके चित्रनगरीचे कर्तृत्ववान स्त्री शक्तीकडे नेतृत्व!

International Women Day : दादासाहेब फाळके चित्रनगरीचे कर्तृत्ववान स्त्री शक्तीकडे नेतृत्व!

दादासाहेब फाळके चित्रनगरीचे नेतृत्व कर्तृत्ववान स्त्री शक्तीकडे! स्वाती म्हसे-पाटील, गीता देशपांडे, चित्रलेखा खातू-रावराणे यांच्या नेतृत्वाखाली चित्रनगरीचा विकास आणि प्रतिष्ठा वाढली.
Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीचे नेतृत्व कर्तृत्ववान स्त्री शक्तीकडून केले जात आहे. व्यवस्थापकीय संचालक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, मुख्य लेखावित्त अधिकारी या महत्त्वाच्या पदासह इतर सहवर्गातील महिला अधिकाऱ्यांच्या हाती चित्रनगरीच्या विकासाची दोरी असून नवनवीन संकल्पना राबवित चित्रनगरीच्या प्रतिष्ठेत मानाचा तूरा रोवत आहे.

दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी स्वाती म्हसे-पाटील (भा.प्र.से), आहेत. मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून गीता देशपांडे आणि वित्तीय सल्लागार मुख्य लेखा वित्त अधिकारी म्हणून चित्रलेखा खातू-रावराणे कार्यरत आहेत. या त्रिशक्तीकडून चित्रनगरीचा समर्थपणे कारभार सुरू आहे.

बदलत्या काळानुसार चित्रनगरीचा वेग हा काळानुरुप कायम राहील. यासाठी त्या दक्ष व सतर्कही आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून चित्रनगरीच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे.

स्वाती म्हसे-पाटील, चित्रलेखा खातू-रावराणे आणि गीता देशपांडे यांना प्रशासनाचा गाढा अनुभव आहे.

स्वाती म्हसे-पाटील यांनी महाराष्ट्रातून एमपीएससीत १९९३ मध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. ३२ वर्ष सेवा बजाविताना त्यांनी प्रशासनात अनेक महत्वपूर्ण व लोकाभिमुख निर्णय घेऊन समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत दिलासा देणारा प्रयत्न केला. २०२१ साली महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी केली होती. त्यावेळी त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा अचूक वापर आणि नियोजनबद्ध कामकाज करून विभागाचा कारभार गतिमान केला. नागरी पुरवठा विभागात कार्यरत असताना ग्राहक संरक्षणाकरिता महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. स्वस्त धान्य दुकानांचे संपूर्ण संगणकीकरण केले. त्यामुळे विभागात पारदर्शकता आली. आता त्या चित्रनगरीला वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणून तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

चित्रनगरीच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या गीता देशपांडे यांनी २००० पासून राज्याच्या विविध विभागात भूमि अभिलेख अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच प्रशासकीय सेवेत असताना आध्यात्मिक संस्कारांचा वारसा कायम जोपासला. चित्रनगरीत उत्तम व नीटनेटकी प्रशासकीय व्यवस्था राबविण्यासाठी त्या दक्ष आहेत.

चित्रलेखा खातू-रावराणे यांनी शासकीय सेवेत २०११ रोजी सहायक संचालक (वित्त व लेखा सेवा) म्हणून प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अन्न नागरी पुरवठा विभागात कार्यरत असताना अर्थसंकल्पसंदर्भातील महत्त्वाचे काम केले. कोषागार अधिकारी म्हणून शासकीय जमा लेखांकन प्रणाली उत्तमपणे राबविली. आता त्या चित्रनगरीत कार्यरत असताना प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी होत असून, नवनवीन कल्पना राबवित आहेत. या तिघींच्याही कार्याला चित्रनगरीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनही उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com