Ramakrishna Jayanti
RAMAKRISHNA PARAMAHAMSA JAYANTI 2026 CELEBRATING SPIRITUALITY, SIMPLICITY, AND UNIVERSAL BROTHERHOOD

Ramakrishna Jayanti: रामकृष्ण परमहंस जयंतीनिमित्त जाणून घ्या, साधेपणातून दिलेला विश्वबंधुत्वाचा संदेश

Universal Brotherhood: रामकृष्ण परमहंस जयंती २०२६ साधेपणा, आध्यात्मिकता आणि सर्वधर्म समभावाचा उत्सव आहे; त्यांच्या शिकवणीत मानवसेवा, प्रेम, सत्य आणि करुणा यांचा संदेश आजही प्रेरणादायी आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

फाल्गुन शुक्ल द्वितीयेला साजरी होणारी रामकृष्ण परमहंस जयंती ही केवळ एका संताची जयंती नसून मानवतेचा, एकतेचा आणि आध्यात्मिक समन्वयाचा उत्सव मानला जातो. १८ फेब्रुवारी १८३६ रोजी बंगालमधील कामारपुकुर येथे गदाधर चट्टोपाध्याय या नावाने जन्मलेले हे महान संत पुढे संपूर्ण जगाला “सर्व धर्म समान” हा विचार देणारे आध्यात्मिक मार्गदर्शक ठरले.

बालपणापासून अध्यात्माची ओढ

गरीब पण श्रद्धाळू कुटुंबात जन्मलेल्या रामकृष्णांच्या आयुष्यात लहान वयातच वडिलांचे निधन झाले. तरीही त्यांची ईश्वरनिष्ठा ढळली नाही. दक्षिणेश्वरातील काली मंदिरात पूजारी म्हणून कार्य करत असताना त्यांना देवी कालीप्रती गाढ भक्ती निर्माण झाली. विविध धर्ममार्गांचा प्रत्यक्ष अनुभव घेत त्यांनी एकच सत्य मांडले“देव एकच आहे, मार्ग अनेक आहेत.”

शारदा देवींची साथ

त्यांचा विवाह शारदा देवी यांच्याशी झाला. पुढे त्या त्यांच्या आध्यात्मिक सहचारिणी ठरल्या. दोघांचे नाते हे सांसारिकतेपलीकडचे, अध्यात्मिक समर्पणाचे उदाहरण मानले जाते.

विचारांची क्रांती

रामकृष्ण परमहंसांनी समाजात प्रेम, सत्य आणि करुणेचा संदेश दिला. त्यांनी सांगितले, मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे. विचार, वाणी आणि कृती शुद्ध असाव्यात. अंधश्रद्धेपेक्षा अनुभवाधारित श्रद्धेला महत्त्व द्यावे. त्यांच्या शिकवणीने १९व्या शतकातील समाजमनाला नवी दिशा दिली.

कार्याचा वारसा

त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी गुरुंच्या प्रेरणेने रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांची स्थापना केली. बेलूर मठ हे आजही त्यांच्या विचारांचे केंद्रस्थान मानले जाते. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सेवेच्या क्षेत्रात ही संस्था जगभर कार्यरत आहे. १६ ऑगस्ट १८८६ रोजी कोलकाता येथे त्यांचे निधन झाले, पण त्यांचे विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. साधी राहणी, उच्च विचार आणि सर्वधर्म समभावाचा संदेश हीच त्यांच्या जयंतीची खरी ओळख आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com