Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास कसा होणार?

Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास कसा होणार?

अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या भीषण दुर्घटनेमागचं नेमकं कारण काय याचा शोध घेण्यासाठी आता सखोल आणि शास्त्रशुद्ध तपास प्रक्रिया सुरू झाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या भीषण दुर्घटनेमागचं नेमकं कारण काय याचा शोध घेण्यासाठी आता सखोल आणि शास्त्रशुद्ध तपास प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्व्हेस्टीगेशन ब्युरो (AAIB) आणि नागरी विमान महासंचनालय (DGCA) यांच्या संयुक्त देखरेखीखाली हा तपास तीन महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये केला जाणार आहे. अपघातस्थळी प्राथमिक साईट इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करण्यात आले असून, दुर्घटनाग्रस्त विमानातून अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘ब्लॅक बॉक्स’ सुरक्षितरित्या हस्तगत करण्यात आला आहे. सध्या ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हरीची प्रक्रिया सुरू असून, याच डेटावरून अपघाताच्या काही मिनिटांआधी नेमकं काय घडलं याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

पहिला टप्पा : ब्लॅक बॉक्समधील तांत्रिक माहितीचे विश्लेषण

तपासाच्या पहिल्या लेअरमध्ये ब्लॅक बॉक्समधील दोन प्रमुख घटक – फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये विमानाचा वेग, उड्डाणाची उंची, इंजिनचे तापमान, इंधनाचा दाब, हवेचा दाब, पंखांची हालचाल, ऑटो पायलट प्रणाली, तसेच पायलट आणि सहपायलट यांच्यातील शेवटच्या संभाषणाचा समावेश असेल. या तांत्रिक माहितीमधून मानवी चूक, तांत्रिक बिघाड किंवा हवामानाशी संबंधित कारणांचा अंदाज घेतला जाणार आहे.

दुसरा टप्पा : अवशेषांचे प्रयोगशाळीय परीक्षण

दुसऱ्या लेअरमध्ये विमानाचे अवशेष विविध विशेष प्रयोगशाळांमध्ये पाठवले जाणार आहेत. इंजिन, पंख, फ्युसेलाज आणि कंट्रोल सिस्टीम्स यांची तपासणी करून त्यामध्ये कोणताही यांत्रिक दोष, स्फोट, धातूतील तडे किंवा आधीपासून असलेली समस्या होती का, याचा अभ्यास केला जाणार आहे. हा टप्पा वेळखाऊ असला तरी अपघाताच्या मूळ कारणांवर प्रकाश टाकणारा ठरणार आहे.

तिसरा टप्पा : प्राथमिक व अंतिम अहवाल

या सर्व तपासानंतर AAIB कडून अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला जाईल. मात्र अंतिम निष्कर्ष मांडणारा अंतिम अहवाल येण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या अंतिम अहवालात जबाबदारी निश्चित होणार असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शिफारसीही मांडल्या जातील. या संपूर्ण तपास प्रक्रियेवर नागरी विमान महासंचनालयाची (DGCA) बारकाईने नजर असून, सत्य बाहेर यावं यासाठी तपासाला गती देण्यात येत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या तीन लेअर तपासातून मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com