Mulund : मुलूंडमध्ये मेट्रो बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू, अनेक जखमी असल्याची भीती
मुलुंड परिसरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. बांधकाम सुरू असताना अचानक काँक्रीटचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, तर काही जण जखमी झाल्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मेट्रो पुलाचा एक भाग अचानक कोसळला आणि खाली उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनावर तसेच रिक्षावर पडला. स्लॅबखाली एक व्यक्ती अडकल्याची माहिती मिळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले
या दुर्घटनेमुळे मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यापूर्वीही मेट्रोच्या कामावरून दर्जा आणि सुरक्षेबाबत टीका करण्यात आली होती. स्थानिक नागरिकांनी बांधकाम प्रक्रियेत योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोसळलेला स्लॅब बांधकामाच्या प्रक्रियेत असलेला भाग होता. अचानक झालेल्या या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, बांधकामातील निष्काळजीपणा किंवा अन्य कोणते कारण याचा तपास संबंधित विभागाकडून केला जात आहे.
मेट्रो प्रशासनाकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काही काळासाठी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी बांधकाम स्थळी सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मुलुंडमधील या दुर्घटनेने पुन्हा एकदा मोठ्या पायाभूत प्रकल्पांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. प्रशासन या घटनेवर काय भूमिका घेणार आणि दोषींवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
