नेताजींनी आजचा भारत बघितला असता, तर अभिमान वाटला असता – नरेंद्र मोदी
लोकशाही न्यूज नेटवर्क
भारताने कोरोनासारख्या महामारीला पूर्ण ताकदीने दिलेला लढा, भारताने तयार केलेली कोरोना प्रतिबंधक लस हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिले असते तर, त्यांना अभिमान वाटला असता, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने कोलकात्याच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी नेताजींना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. नेताजी हे भारताच्या सामर्थ्य आणि प्रेरणेचे प्रतिबिंब आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या आधुनिक सैन्याचे निर्माते होते. नेताजींसारख्या महापुरुषाला कोटीकोटी प्रणाम, असे मोदी म्हणाले.
आज देशात दारिद्र्य, निरक्षरता आणि रोगराई या सर्वात मोठ्या समस्या आहेत, असे नेताजी मानत. आपल्या याच समस्यांविरोधात लढायचे आहे. आज भारताला आत्मनिर्भर बनवायचे आहे, यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. एकत्रित प्रयत्नांतूनच हे साध्य होईल, असे पंतप्रधान म्हणाले. कोरोनावरील लस आपल्या संशोधकांचे यश आहे. शेजारील देशांनाही भारत लसीचा पुरवठा करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
एलएसीपासून एलओसीपर्यंत शक्तिशाली भारताचा अवतार संपूर्ण जग पाहात आहे. नेताजींना हाच भारत अभिप्रेत होता. भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा जेव्हा-जेव्हा प्रयत्न झाला आहे, त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पराक्रम दिवस
नेताजींच्या असीम धैर्य आणि पराक्रमाच्या सन्मानार्थ आजचा दिवस 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करण्यात आला. नेताजींच्या आयुष्यावरील प्रदर्शनाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले. तसेच नेताजींच्या स्मृतीप्रित्यर्थ काढलेल्या नाण्याचे आणि टपाल तिकीटाचे प्रकाशनही मोदींनी केले.