हा सण आहेच पण वाद नको…
आपल्या परंपरेनुसार आपण सगळे सण तिथीनुसार साजरे करतो… आपले कोणतेही सण तारखेनुसार साजरे करत नाही… दिवाळीदेखील आपण तारखेऐवजी नव्हे तर तिथीनुसार साजरे करतो. वाढदिवस, जन्मदिवस हे आपल्या सारख्या सामान्य लोकांचे असतात. मात्र, महापुरुषांची जयंती, त्यातही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपल्यासाठी सण आहे. त्यामुळे आपला हा सण तिथीनुसार साजरा व्हायला हवाय, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय… गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यावरून राजकीय पक्षांमध्ये वाद सुरू आहे… शिवसेना वा मनसे या पक्षांच्यावतीने शिवरायांची जयंती तिथीनुसार साजरी केली जाते तर अन्य पक्ष आणि काही संघटना शिवरायांची जयंती तारखेनुसार म्हणजेच आजच्या दिवशी १९ फेब्रुवारीला साजरी करतात… शिवराय हे मराठी माणसांचेच नव्हतेर अखंड हिंदुजनांचे दैवत आहेत. त्यांनी दिलेल्या हिंदवी स्वराज्याचा लढा आपल्या सर्वांसाठी आजही प्रेरणादायी आहे, आणि युगानुयुगे राहील… शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाल्याची इतिहासात नोंद आहे… मात्र त्यातही वेगवेगळ्या बखरींमध्ये व शकावली नुसार सन १६२७ की १६३० हे ठरवण्यात प्रामुख्याने दोन प्रवाद दिसून येतात. आता ही जयंती तिथीनुसार साजरी करायची तर ती फाल्गुन महिन्यात येते.. जी तमाम शिवप्रेमी ती साजरी करतात… काही लोकांच्या मते शिवरायांचा जन्म 6 एप्रिल रोजी झाला आहे.. त्यामुळे ही तारीख मानणारा वर्ग वेगळाच आहे… शिवरायांच्या जन्मतारखेबाबतचा वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1966 मध्ये ज्येष्ठ इतिहासकारांची एक समिती नेमली होती. या समितीतील सदस्यांनी सर्व ऐतिहासिक पुरावे आणि बखरीतील दस्तावेज तपासले पण समितीच्या सदस्यांची त्या तारखेवर एकवाक्यता होवू शकली नाही. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आपापली निवेदनं समितीसमोर ठेवली आणि अखेर सरकारलाच निर्णय घ्यायला सुचवलं. त्यामुळे सरकारनेही जोपर्यंत इतिहासकारांमध्ये एकमत होत नाही, तोपर्यंत जुनीच तारीख कायम ठेवण्याचा निर्वाळा दिला होता… अखेर 2000 साली आमदार रेखा खेडेकर यांनी विधिमंडळातील पुरावे आणि 1966च्या समितीचा अहवाल मांडून 19 फेब्रुवारी 1630 हा शिवाजी महाराजांचा जन्म दिवस असल्याचा प्रस्ताव मांडला, सभागृहाने त्याला मान्यताही दिली… त्यानंतर सरकारी शिवजयंतीचा दिवस म्हणून 19 फेब्रुवारीला राज्यभरात शिवजयंती साजरी होवू लागली… पण तेव्हा विरोधी बाकांवर बसणाऱ्या शिवसेनेनं या तारखेला तीव्र विरोध करत तिथीनुसार जयंती साजरी करण्याचे आदेश त्यांच्या शिवसैनिकांना दिले… पुढे हाच कित्ता शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या महाराष्ट्र निर्माण सेनेनं गिरवला.. त्यांनीही तिथीप्रमाणे शिवजयंती साजरा करण्याचे आदेश काढले… आता 2019 मध्ये शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस मिळून शिवरायांच्या तारखेबाबत असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने यावर तोडगा निघावा अशीही विनंती केली गेली… पण 2019 मध्ये आलेल्या 'मविआ' सरकारने यावर ठोस निर्णय न घेतल्यामुळे आजही आपण शिवरायांची जयंती दोन वेळा साजरी करतोय… काही लोकांच्या भावना दुखावल्या जावू नयेत म्हणून यावर तोडगा निघत नसल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे… शालिवाहन शकेच्या तिथीनुसार साजरी करण्याचा आग्रह शिवसेनेसारख्या काही राजकीय पक्षांनी धरलाय…महाराज युगपुरुष होते, त्यांची दूरदृष्टी, आदर्श राज्यकारभार, रणनीती याची अनेक आपल्यासमोर उदाहरण आहेत… महाराजांचे नाव घेतल्यावर अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते… महाराज कधीही झुकले नाहीत. त्यांचे शौर्य, व्यक्तिमत्व, रयतेच्या हितासाठी केलेले कार्य, दूरदृष्टी याचे दाखले आजही दिले जातात. स्वदेश आणि स्वधर्म यांच्या संरक्षणार्थ आर्थिक व राजकीय दृष्ट्या सबळ अश्या स्वराज्याचे निर्माते असलेले सार्वभौम राजे, रयतेच्या प्रतिष्ठेचे उद्गाते होते… त्यांच्या नावाने केवळ महाराष्ट्रात नव्हेतर देशभर राजकारण करण्याचा प्रयत्न होतो… किमान ज्यांना आपण आपले दैवत मानले आहे, त्यांच्या जयंती दिनावरून आपापले वाद मिटवावेत हाच शिवरायांच्या चरणी नतमस्तक होवून मानाचा मुजरा ठरू शकतो…
नरेंद्र कोठेकर

