अबब! एकाच सामन्यात मोडले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले 8 विक्रम

अबब! एकाच सामन्यात मोडले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले 8 विक्रम

सध्या आशियाई क्रिडा स्पर्धा सुरू आहे. यावर्षी या स्पर्धेत पहिल्यांदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला.
Published by :
Team Lokshahi

सध्या आशियाई क्रिडा स्पर्धा सुरू आहे. यावर्षी या स्पर्धेत पहिल्यांदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला. नुकताच या स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानंही सुवर्ण पदक पटकावतं इतिहास रचला. पण त्याहून जास्त मोठा कहर केला तो नेपाळच्या संघानं.. नेपाळनं मंगोलियाविरुद्ध खेळत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले तब्बल 8 विक्रम मोडीत काढलेत.

आशियाई क्रिडा स्पर्धेला नुकतीच सुरुवात झाली आहे. यावेळी कधी नव्हे ते या आशियाई क्रिडा स्पर्धेत क्रिकेट या खेळाचा समावेश केला आहे, आणि या स्पर्धेत झालेल्या नेपाळ विरुद्ध मंगोलियाच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले एक दोन नव्हे तर तब्बल 8 विक्रम मोडित निघालेत. त्यातील सर्वात मोठा विक्रम तो टी 20 क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड इतकंच काय तर टी 20 क्रिकेटमध्ये मोनोपॉली असणाऱ्या वेस्ट इंडिजलाही कधी 20 षटकांत 300 धावांचा आकडा गाठणं शक्य झालं नव्हतं. तिथं नेपाळनं 3 विकेट्सच्या बदल्यात 314 धावांचा डोंगर उभा केला अन् टी 20 क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम रचला.

याआधीचा टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोर

अफगानिस्तान- 278/3 वि. आयर्लंड

ऑस्ट्रेलिया- 263/3 वि. श्रीलंका

श्रीलंका- 260/6 वि. केनया

हा बलाढ्य स्कोर उभारत असताना नेपाळच्या संघानं सामन्यात तब्बल 26 सिक्स लगावलेत. कोणत्याही संघानं एका सामन्यात लगावलेले हे सर्वाधिक षटकार ठरलेत. याशिवायही नेपाळच्या संघाने अनेक विक्रम आपल्या नावावर केलेत. नेपाळनं मंगोलियाचा या सामन्यात तब्बल 273 धावांनी पराभव केलाय जो आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे.

विशेष म्हणजे हा विजय मिळवत असताना मंंगोलियाचा डाव अवघ्या 41 धावांवर आटोपला. या 41 धावांमध्ये सुद्धा 23 अधिकच्या धावांचा समावेश होता. अर्थात मंगोलियाच्या फलंदाजांनी या संपूर्ण सामन्यात केवळ 18च धावा करता आल्या. जी आजवरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या आहे.

आता वळूयात काही वैयक्तिक विक्रमांकडे. या सामन्यात नेपाळचा फलंदाज कुशल मल्लाने याने अवघ्या 34 चेंडूत शतक पूर्ण केलंय. यापूर्वी हा विक्रम टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर होता.. रोहितनं 35 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. हा विक्रम सुद्धा आता मोडित निघालाय. विशेष म्हणजे ज्या कुशल मल्लानं रोहितचा हा विक्रम मोडीत काढलाय त्या मल्लाचं वय आहे अवघं 19 वर्ष.. या शतकासह कुशल मल्ला हा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा दुसरा सर्वात युवा फलंदाजही ठरलाय..

इतकंच काय तर भारताचा स्टार खेळाडू युवराज सिंहच्या नावावर असणारा सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रमही याच सामन्यात मोडित निघालाय. नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंहनं अवघ्या 9 चेंडून अर्धशतक झळकावलंय. शिवाय 10 चेंडून 52 धावा करत दीपेंद्रनं टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेटनं फलंदाजी करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केलाय.

आशियाई क्रिडा स्पर्धेत झालेल्या या सामन्यात नेपाळनं मोडलेले हे 8 रेकॉर्ड्स सध्या तरी केवळ विक्रमांच्या यादीत जमा झाले असेल तरी, फलंदाजी कुशल मल्लानं 50 चेंडूत मारलेले 137 रन्स दीपेंद्र सिंहनं अवघ्या 9 चेंडूत मारलेली फिफ्टी... नेपाळच्या सर्व गोलंदाजांनी केलेली कडक बॉलिंग... अन् मंगोलियाचा धुव्वा उडवत नेपाळनं या सामन्यात मिळवलेला एकतर्फी विजय... या सर्व गोष्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही मोजक्या संघाची असणारी मत्तोदारी मोडणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com