Annoucement of Khelratn
Annoucement of Khelratn

Khelratn: डी गुकेश, मनु भाकरसह एकूण चौघांना खेळरत्न, ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराची घोषणा

डी गुकेश, मनु भाकर, हरमनप्रीत सिंह आणि प्रवीण कुमार यांना खेळरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तसेच 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
Published by :
Published on

क्रिडाविश्वातून अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. खेळरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतासाठी विविध क्रीडा प्रकारात 2024 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

चेस वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश आणि ऑलिम्पिकमध्ये भारताला 2 मेडल मिळवून देणाऱ्या मनु भाकर यासह एकूण चौघांना यंदाचा खेळरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसंच एकूण 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 17 जानेवारीला राष्ट्रपती भवनात या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर खेळरत्न पुरस्काराचे मानकरी कोण आहेत? जाणून घेऊयात

डी गुकेश, महिला नेमबाज मनु भाकर, हॉकीपटू हरमनप्रीत सिंह आणि पॅरालिम्पिकपटू प्रवीण कुमार या चौघांना खेळरत्न पुरस्कार म्हणजेच मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार (२०२४) ने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे याच्यासह एकूण 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कोणाला खेळरत्न?

डी गुकेश

साल २०२४ बुद्धिबळ स्पर्धेसाठी महत्त्वाचं ठरलं. डी गुकेशने बुद्धिबळाच्या महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेक मेट करत वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवली. डी गुकेश याने डिंग लिरेन याचा 7.5-6.5 अशा फरकाने पराभव केला होता. डी गुकेशने यासह विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवला.

मनु भाकर

साल २०२४ मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी खास होती. भारतीय महिला नेमबाजपटू मनु भाकर हीने एकाच स्पर्धेत 2 पदकं मिळवून इतिहास घडवला. मनुने सिंगल आणि मिक्स डबल या दोन्ही प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून दिलं होतं.

हरमनप्रीत सिंह

हॉकी टीम इंडियाने कॅप्टन हरमनप्रीत सिंह यांच्या नेतृत्वात ऑलिम्पिकमध्ये सलग दुसर्‍यांदा मेडल मिळवलं होतं. हरमनला या कामगिरीसाठी खेळरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

प्रवीण कुमार

पॅरालिम्पिकमध्ये पॅरा हाय जंपर प्रवीण कुमारने टी 64 वर्गात सुवर्ण कामगिरी केली. गुडघ्यापासून खाली एक किंवा दोन्ही पाय नसलेल्या खेळाडूंचा समावेश या टी 64 वर्गात केला जातो. या श्रेणीतील खेळाडू धावण्यासााठी कृत्रिम पायाचा वापर करतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com