भारताकडून पाकिस्तानला 267 धावांचं लक्ष्य; हार्दिक-इशानचं अर्धशतक
नवी दिल्ली : आशिया चषक 2023 च्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भारत हायव्हॉल्टेज सामना रंगला. सर्वप्रथम फलंदाजी करताना भारताने 266 धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने एका वेळी ६६ धावा होईपर्यंत ४ विकेट गमावल्या होत्या. येथून इशान किशन आणि हार्दिक पंड्याने पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत डाव सांभाळला. पाकिस्तानकडून या सामन्यात शाहीन आफ्रिदीने 4 तर नसीम शाह आणि हरिस रौफने 3-3 विकेट घेतल्या.
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिली 4 षटके रोहित आणि गिलच्या जोडीने सावध खेळ करत धावसंख्या 15 धावांपर्यंत नेली. यानंतर पावसामुळे सुमारे 20 मिनिटे खेळ थांबवावा लागला. सामना पुन्हा सुरू झाल्याने भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या रूपाने दोन मोठे धक्के बसले.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने आपल्या एका शानदार इनस्विंग चेंडूवर रोहित शर्माला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. यानंतर आफ्रिदीने विराट कोहलीला बोल्ड केले आणि 27 च्या स्कोअरवर 2 गडी बाद केले. यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने झटपट धावा काढण्याचा प्रयत्न केला मात्र वैयक्तिक १४ धावांवर तो हरिस रौफचा बळी ठरला.
टीम इंडियाला 66 धावांवर शुभमन गिलच्या रूपाने चौथा धक्का बसल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांचे दडपण स्पष्टपणे दिसून आले. अशाप्रकारे भारतीय संघाने 66 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्यासोबत इशान किशनने भारतीय डावाची धुरा सांभाळली. दोघांनी 5व्या विकेटसाठी 138 धावांची विक्रमी भागीदारी केली.
इशानने 81 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 82 धावा केल्या. याशिवाय पंड्याने 90 चेंडूत 87 धावांची खेळी केली. त्याने 1 षटकार आणि 7 चौकार लगावले. इशान आणि पांड्याने दमदार खेळी नक्कीच केली, पण दोघांचेही शतक हुकले. या दोघांनी बाद होण्यापूर्वी भारताची धावसंख्या 200 च्या पुढे नेली होती. या सामन्यात भारतीय संघाचा डाव 48.5 षटकात 266 धावांवर आटोपला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 4 तर हरिस रौफ आणि नसीम शाहने 3-3 विकेट घेतल्या.