रोहन बोपण्णाने रचला इतिहास! ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीचे पटकावले विजेतेपद

रोहन बोपण्णाने रचला इतिहास! ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीचे पटकावले विजेतेपद

भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा याने त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेनसह ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ चे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

नवी दिल्ली : भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा याने त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेनसह ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ चे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. रोहन बोपण्णा-मॅथ्यू एबडेन जोडीने सिमोन बोलेली आणि आंद्रिया वावासोरी या इटालियन जोडीचा ७-६, ७-५ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. वयाच्या 43 व्या वर्षी बोपण्णा पुरुष टेनिसमध्ये ग्रँड स्लॅम चॅम्पियन बनणारा सर्वात वयस्कर खेळाडू देखील ठरला. त्याने जीन-ज्युलियन रॉजरचा विक्रम मोडला.

रोहन बोपण्णा नुकताच पुरुष दुहेरी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्कारासाठीही त्यांची निवड झाली होती. एब्डेनचे हे दुसरे पुरुष दुहेरी विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियन मॅक्स पर्सेलसोबत २०२२ मध्ये विम्बल्डन जिंकले होते. रोहन बोपण्णा हा ग्रँड स्लॅम जिंकण्याचा पराक्रम करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला. याआधी पुरुष टेनिसमध्ये भारतासाठी केवळ लिएंडर पेस आणि महेश भूपती यांनीच मोठी जेतेपदे पटकावली आहेत, तर सानिया मिर्झाने महिला टेनिसमध्ये ही कामगिरी केली आहे.

रोहन बोपण्णा २०१३ आणि २०२३ मध्ये यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, पण अंतिम फेरीत त्याचा पराभव झाला होता. रोहन बोपण्णाच्या नावावर फक्त एक ग्रँड स्लॅम जेतेपद आहे, जे त्याने २०१७ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये कॅनडाच्या गॅब्रिएला डब्रोव्स्कीसह मिश्र दुहेरीत जिंकले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com