Wasim Akram On Ind vs Pak : Asia Cup 2025 अंतिम सामन्यापूर्वी वसीम अक्रमची भारताच्या बाजूने भविष्यवाणी; पाकिस्तानी खेळाडूंना दिला 'हा' सल्ला
तब्बल 41 वर्षांच्या इतिहासात भारत आणि पाकिसातन पहिल्यांदा आशिया कपच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. क्रिकेटप्रेमींसाठी भारत आणि पाकिस्तान सामना हा केवळ सामना नसून ती दोन चाहत्यांमधील उत्सुकता असते. टीम इंडियाने आतापर्यंत 8 वेळा आशिया कपावर नाव कोरले आहे. दरम्यान 28 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईच्या मैदानावर विजेतेपदाची निर्णायक लढत रंगणार आहे.
विशेष म्हणजे या स्पर्धेत दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. भारतातून टीम इंडियाच्या चाहत्यांची अपेक्षा आहे की अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी यांसारखे स्टार खेळाडू पाकिस्तानी संघाला पाणी पाजेल. जर भारताने हा सामना जिंकला तर टीम इंडिया आशिया कपमधील नववे विजेतेपद जिंकू शकते आणि पाकिस्तानवर विजयाची हॅटट्रिक देखील करू शकते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील अनेक दिग्गज खेळाडूंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. याचपार्श्वभूमिवर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू वसीम अक्रमने टीम इंडियाची बाजू घेत एक भविष्यवाणी केली आहे. वसीम अक्रमने आशिया कपच्या अंतिम फेरीसाठी भारताला प्रबळ दावेदार म्हणून घोषित केले आहे. तर पाकिस्तानी संघाला सल्ला देखील दिला आहे.
वसीम अक्रम यांची टीम इंडियाच्या बाजूने भविष्यवाणी
पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू वसीम अक्रम म्हणाले की, "मला अशी आशा आहे की, रविवारी होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान संघ पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल. मात्र रविवारी टीम इंडिया विजयाचा प्रबळ दावेदार असेल. कारण, माझ्यासह संपूर्ण जगाने पाहिलं आहे की, टी-20 च्या सामन्यात काहीही घडू शकते. एक चांगली खेळी किंवा एक चांगले ओव्हर संपूर्ण सामन्याचे स्वरूप बदलू शकतो."
वसीम अक्रम यांचा पाकिस्तानी संघाला सल्ला काय?
तसेच त्यांनी पाकिस्तानी संघाला टीम इंडियातील सलामीवीरांना लवकर बाद करण्याचा सल्ला देखील दिला आहे. सुपर 4 फेरीच्या सामन्यात अभिषेक आणि गिल यांनी पाकिस्तानविरुद्ध 105 धावांची भागीदारी केली. याचपार्श्वभूमिवर ते म्हणाले की, "यावेळी पाकिस्तानी संघाला जिंकण्यासाठी भारतीय संघातील सलामीवीर फलंदाजांना लवकर बाद करावे लागेल, तर टीम इंडियाची मधली फळी उद्ध्वस्त करणे सोपे जाऊ शकते. विशेषतः अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल लवकर बाद झाल्यामुळे, टीम इंडियाची स्थिती बॅकफूटवर असू शकते. हा सामना अत्यंत चुरशीचा असेल आणि मला आशा आहे की जो संघ सर्वोत्तम खेळेल तो विजयी होईल."