India Vs Australia : ऑस्ट्रेलियाची ताकद वाढली! 'त्या' खेळाडूच्या पुनरागमनाने गोलंदाजीस नवी धार; संघात कोणा-कोणाचा समावेश
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिकेची तयारी जोरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली होती आणि आता क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या दोन्ही संघांच्या घोषणेमुळे आगामी मालिका अधिकच रोमांचक ठरणार आहे.
भारतीय संघ या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत दीर्घ विश्रांतीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजीला नवसंजीवनी मिळणार आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियानेही आपला पूर्ण ताकदीचा संघ जाहीर करून या मालिकेचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.
मिचेल मार्शला दोन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असून, अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क पुन्हा एकदिवसीय संघात परतला आहे. स्टार्कच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला नवी धार मिळणार आहे. त्याचवेळी आरोन हार्डी, मॅथ्यू कुहनेमन आणि मार्नस लाबुशेन यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी 14 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला असून, त्यात नॅथन एलिस आणि जोश इंगलिस यांचाही समावेश आहे. मिचेल मार्श कर्णधार म्हणून या दोन्ही संघांचे नेतृत्व करणार आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ:
मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, अॅलेक्स केरी, कूपर कॉनोली, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, मिचेल ओवेन, मॅथ्यू रेनशॉ, मॅट शॉर्ट, मिचेल स्टार्क आणि अॅडम झांपा.
टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ:
मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट, टीम डेव्हिड, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, मॅट शॉर्ट, मार्कस स्टोइनिस आणि अॅडम झांपा यांचा समावेश आहे.
भारताचा संघ:
वनडे साठी शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल आणि मोहम्मद सिराज यांच्यासह दमदार खेळाडूंचा समावेश आहे. टी-20 मध्ये सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार असून, रिंकू सिंग, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांसारखे तरुण चेहरे संधी मिळवणार आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 19 ऑक्टोबरला पर्थमध्ये होणार आहे, तर टी-20 मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरू होईल. दोन्ही संघांच्या आक्रमक संघरचनेमुळे ही मालिका प्रेक्षकांसाठी एक थरारक क्रिकेट उत्सव ठरण्याची शक्यता आहे.