Asia Cup 2025 IND vs PAK : "...त्यामुळे सामन्याला नकार देणं" भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर BCCI ने काय म्हटलं
आशिया कप 2025 चं वेळापत्रक जाहीर झाल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला देशभरातून तीव्र विरोध होत आहे. 9 सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात झाली असून, 14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानविरुद्ध सामना रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. तरीदेखील हा सामना मल्टी नॅशनल स्पर्धेअंतर्गत असल्यामुळे रद्द होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.
चाहत्यांचा विरोध लक्षात घेऊन बीसीसीआयवर दबाव वाढला असतानाच सचिव देवजित सैकीया यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की, "रविवारी होणाऱ्या या सामन्यासाठी मी भारतीय संघाला शुभेच्छा देतो. पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवण्यासाठी आमचे खेळाडू पूर्ण ताकदीने मैदानात उतरतील, याचा विश्वास आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार बहुराष्ट्रीय स्पर्धेत भारताला सहभागी व्हावं लागतं, त्यामुळे सामन्याला नकार देणं शक्य नाही."
दरम्यान, माजी क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनीदेखील या वादावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं की, एसीसी आणि आयसीसीच्या स्पर्धेत सर्व संघांना खेळणं बंधनकारक असतं. जर संघाने खेळ नाकारला तर स्पर्धेतून बाहेर पडावं लागतं आणि गुण प्रतिस्पर्धी संघाला दिले जातात. मात्र त्यांनी ठाम भूमिका घेत सांगितलं की, "भारत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही. पाकिस्तानने दहशतवादाला आळा घातल्याशिवाय द्विपक्षीय सामने होणारच नाहीत."
यामुळे चाहत्यांचा विरोध कायम असला तरी आशिया कपमधील भारत-पाकिस्तान महामुकाबला होणार हे निश्चित झालं आहे. एका बाजूला देशभरात आंदोलनं आणि निदर्शनं सुरू असताना, दुसऱ्या बाजूला चाहत्यांचं लक्ष आता संघाच्या कामगिरीकडे लागलं आहे.