Asia Cup 2025 Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादव अंतिम सामना खेळणार नाही? पीसीबीच्या तक्रारीमुळे टीम इंडियाच्या संघावर होणार परिणाम
थोडक्यात
रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना रंगणार
कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या विधानावर पीसीबीने तक्रार दाखल केली
सूर्यकुमार यादवला अधिकृत इशारा
आशिया कप 2025 ची सर्वात मोठी लढत आता काही तासांवर आली आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. मात्र या निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठ्या चिंतेला सामोरे जावे लागत होते. कारण, कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या विधानावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती.
14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या विजयाच्या वेळी सूर्यकुमारने सामना भारतीय सैन्य आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना समर्पित केला होता. हे विधान राजकीय स्वरूपाचे असल्याचा दावा करत पीसीबीने आयसीसीकडे कारवाईची मागणी केली.
या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी सूर्यकुमारला केवळ अधिकृत इशारा दिला आहे. बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारीही या सुनावणीत उपस्थित होते. रिचर्डसन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या विधानामुळे खेळाच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, पण तो गंभीर उल्लंघन नाही. त्यामुळे कोणतीही सामन्यातून बंदीची कारवाई करण्यात येणार नाही.
आयसीसीच्या शिस्तपालन नियमांनुसार ही घटना लेव्हल-1 मध्ये गणली जाते. अशा प्रकारच्या उल्लंघनामुळे खेळाडूवर दंड किंवा डिमेरिट पॉइंट्स लागू शकतात, पण सामन्यात खेळण्यावर बंदी येत नाही.
यामुळे आता भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे सूर्यकुमार यादव फायनलमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे. संपूर्ण स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली असून, कर्णधार उपलब्ध असल्याने संघाचा आत्मविश्वास दुप्पट होईल. हा निकाल लागल्यानंतर संघ आणि चाहत्यांची धाकधूकही कमी झाली आहे.