Jasprit Bumrah : बुमराहची लवकरच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती? 'या' माजी क्रिकेटरच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण, "कोहली, रोहित आणि अश्विननंतर बुमराहसुद्धा..."
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, असं भाकीत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे क्रिकेट जगतात चर्चांना उधाण आलं आहे. सध्या मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीनंतर बुमराह टेस्ट फॉरमॅटपासून दूर होऊ शकतो, असं कैफ यांनी म्हटलं आहे.
कैफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केलेल्या व्हिडिओमधून ही माहिती दिली. त्यांनी म्हटलं, "मला वाटतं बुमराह पाचवी कसोटी खेळणार नाही आणि कदाचित तो टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर करेल. सध्या तो शारीरिक अडचणींना सामोरं जात आहे. त्याच्या गोलंदाजीचा वेगही कमी झाला आहे. जर त्याला वाटलं की तो आपलं शंभर टक्के देऊ शकत नाही, तर तो प्रामाणिकपणे या फॉरमॅटमधून स्वतःहून बाजूला होईल."
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत बुमराहची कामगिरी फारशी प्रभावी ठरलेली नाही. त्याने आतापर्यंत 28 षटके टाकून केवळ एकच बळी घेतला आहे आणि त्यासाठी 95 धावा दिल्या आहेत. त्याच्या गोलंदाजीचा वेग 125-130 किमी/ताशी इतकाच राहिला आहे, जे त्याच्या सामान्य क्षमतेपेक्षा कमी आहे. त्याचा थकवा आणि लय हरवलेली दिसत आहे. कैफ यांचं म्हणणं आहे की, जसप्रीत बुमराहच्या प्रामाणिकतेवर कोणतीही शंका नाही.
मात्र त्याच्या शरीराची झीज होत असल्याने भविष्यात त्याला टेस्ट क्रिकेट खेळणं कठीण जाईल. त्यामुळे चाहते आता बुमराहविना भारतीय संघ खेळताना पाहायला तयार राहिले पाहिजे. कैफ पुढे म्हणाले, "कोहली, रोहित आणि अश्विन यांच्यानंतर बुमराहसुद्धा या फॉरमॅटपासून दूर जाईल, अशी शक्यता आहे. मला आशा आहे की माझं भाकीत चुकून जाईल, पण मी जे पाहिलं, त्यावरूनच हे मत मांडतोय."
जसप्रीत बुमराहकडून मात्र या संदर्भात कोणताही अधिकृत निर्णय किंवा घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही, मोहम्मद कैफसारख्या अनुभवी खेळाडूचं निरीक्षण आणि विश्लेषण लक्षात घेतल्यास, भारतीय संघाला लवकरच टेस्ट क्रिकेटमध्ये बुमराहची जागा भरून काढावी लागेल, असं वाटतं. बुमराहने भारतीय संघासाठी अनेक महत्त्वाच्या कसोटींमध्ये निर्णायक कामगिरी केली आहे. मात्र, सातत्याने होणाऱ्या दुखापतींमुळे त्याच्या फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित होतात. आता पाहावं लागेल की तो या चर्चांना मागे टाकून पुन्हा टेस्ट क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनरागमन करतो का, की निवृत्तीचं चित्र स्पष्ट होतं.