IND vs ENG Mohammed Siraj : 'डीएसपी', 'मियां' आणि 'मियां मॅजिक'नंतर सिराजला पडलं आणखी एक टोपणनाव! इंग्लंडचे खेळाडू 'या' नावाने संबोधतात
नुकतीच पार पडलेली इंग्लंड विरुद्ध भारत कसोटीत भारताने 6 धावांनी विजय मिळवला आहे. तर ही कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीने संपन्न झाली आहे. पाचव्या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर 374 धावांचे आव्हान दिले होते. ज्याच्या पाठलाग करत इंग्लंडने 367 धावा करत हातातला डाव गमावला. यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा टीम इंडियासाठी सामनावीर ठरला.
सिराजने सर्व 5 सामन्यात न थकता 23 विकेट्स घेत, भारताच्या गोलंदाजीची शानदार कामगिरी केली. यावेळी त्याने पाचव्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या सामन्यात 9 विकेट्स घेतल्या. क्रिकेटची कोणतीही मालिका असली तर तेव्हा भारतीय खेळाडू मोहम्मद सिराज हा विरुद्ध टीमसमोर आक्रमक झालेला पाहायला मिळतो. मात्र त्याची ही आक्रमकता केवळ मैदानात त्या सामन्यापुर्ती असते, हे देखील तितकेच खरे आहे.
याचपार्श्वभूमिवर इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामन्यात सिराजची आक्रमक खेळी पाहता इंग्लंडच्या काही खेळाडूंनी सिराजला ड्रेसिंग रुममध्ये एक टोपणनाव दिलं आहे. याबाबत इंग्लंडचे माजी खेळाडू नासिर हुसेन आणि स्टूअर्ट ब्रॉड यांनी खुलासा करत सांगितले की, इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये सिराजला 'मिस्टर अँग्री' म्हणून संबोधले जाते.
दरम्यान स्टूअर्ट ब्रॉडने जॉस बटलरला लव्ह ऑफ क्रिकेट या पॉडकास्टमध्ये सांगितले की "मोहम्मद सिराज गोलंदाज फक्त भावूक आहे असं नाही, तर कौशल्यपूर्णही आहे. तुम्ही पाहा, तो फलंदाजांना जाणीवपूर्वक सेट करतो. त्याने या मालिकेत रुट, पोप, स्टोक्स यांसारख्या फलंदाजांना बाद केल आहे. त्याची ताकद म्हणजे अपार मेहनत आणि प्रत्येकवेळी ताकदीने मैदानात उतरण्याची वृत्ती."
तसेच पुढे ब्रॉड म्हणाला की, " मी दुसऱ्या दिवशी मैदानात होतो, त्यावेळेस सिराज त्याच्या गोलंदाजीचा सराव करत होता, आणि बेन डकेट फलंदाजीचा सराव करत होता. त्यावेळेस डकेट सिराजला 'गुड मॉर्निंग मिस्टर अँग्री, तू कसा आहेस, मिस्टर अँग्री?' असं म्हणत संवाद साधू लागला. यावर सिराजच्या चेहऱ्यावर मोठं हसू पाहायला मिळालं होतं."