ICC Women’s ODI World Cup 2025 : WCच्या इतिहासात पहिल्यांदाच असा अंतिम सामना! भारत-दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषक अंतिम सामन्याबद्दल 5 गेम-चेंजर तथ्य
महिला क्रिकेटच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे की, फायनलमध्ये ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड आहे. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर विजय मिळवत आपले पहिले अंतिम स्थान निश्चित केले.
आईसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 चा रोमांचक अंतिम सामना आज (2 नोव्हेंबर) भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात रंगत आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम येथे होणारा हा ऐतिहासिक सामना दुपारी 3 वाजता सुरू झाला आहे. हा सामना विशेष आहे कारण यंदा जगाला एक नवीन विश्वविजेती टीम मिळणार आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच विश्वविजेतेपदासाठी लढणार आहे.
विजेत्या संघाला मिळणार तब्बल 40 कोटींचे बक्षीस
या वर्ल्ड कपचा आर्थिक पैलूही विशेष लक्षवेधी आहे. आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी आधीच जाहीर केले आहे की, महिला वर्ल्ड कप विजेत्या संघाला 4.48 मिलियन डॉलर्स (सुमारे ₹40 कोटी) इतकी बक्षिसाची रक्कम दिली जाईल. तर पराभूत संघालाही 2.24 मिलियन डॉलर्स (सुमारे ₹20 कोटी) मिळतील. विशेष म्हणजे ही रक्कम पुरुष वर्ल्ड कपपेक्षा अधिक आहे, ज्यामुळे महिला क्रिकेटचा दर्जा आणि मान वाढला आहे.
भारत विजयी झाल्यास बीसीसीआयकडून ‘धनवर्षाव’ शक्य
जर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आज विजेतेपद पटकावले, तर बीसीसीआयकडून मोठा सन्मान मिळू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआय विजेत्या संघाला ₹125 कोटींचे बक्षीस देऊ शकतो – हीच ती रक्कम जी मागील वर्षी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यावर पुरुष संघाला देण्यात आली होती.
भारतीय स्टार फलंदाज स्मृती मंधाना सध्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने 8 सामन्यांत 389 धावा केल्या आहेत, ज्यात 1 शतक आणि 2 अर्धशतके आहेत. पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लौरा वोल्वार्ट (470 धावा) आहे. आजच्या सामन्यात मंधानाने शतक झळकावले, आणि वोल्वार्ट कमी धावसंख्येवर बाद झाली, तर ती अव्वल स्थान पटकावू शकते.
मारिझाने कॅपच्या नावावर इतिहास घडण्याची शक्यता
दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज मारिझाने कॅप आज इतिहास रचू शकते. तिच्या नावावर सध्या वर्ल्ड कपमधील 44 बळी आहेत. जर ती आज 6 बळी घेतली, तर ती महिला वर्ल्ड कपच्या इतिहासातील पहिली गोलंदाज ठरेल जिने 50 विकेट घेतल्या आहेत.

