ICC Women’s ODI World Cup 2025 : गेल्या 12 वर्षांपासून सुरु आहे वर्ल्डकपमध्ये 'हा' ट्रेंड! या वेळेसही इतिहास रिपीट होणार?

ICC Women’s ODI World Cup 2025 : गेल्या 12 वर्षांपासून सुरु आहे वर्ल्डकपमध्ये 'हा' ट्रेंड! या वेळेसही इतिहास रिपीट होणार?

मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर आज, 2 नोव्हेंबर रोजी, आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025चा रोमांचक अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर आज, 2 नोव्हेंबर रोजी, आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025चा रोमांचक अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे. या ऐतिहासिक सामन्याची सुरुवात दुपारी 3 वाजता होणार असून, संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष आता या अंतिम लढतीकडे लागले आहे.

भारतीय संघाने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत इतिहास रचला आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघानेसुद्धा जबरदस्त फॉर्म दाखवत पहिल्यांदाच अंतिम फेरीत मजल मारली आहे. त्यामुळे हा सामना थरारक होणार यात शंका नाही. विशेष म्हणजे, 25 वर्षांनंतर महिला विश्वचषकाला नवा विजेता मिळणार आहे.

12 वर्षांची एक अनोखी परंपरा

आकडेवारीनुसार, गेल्या 12 वर्षांत झालेल्या तीन महिला विश्वचषक अंतिम सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानेच विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात टॉसचे महत्त्व निर्णायक ठरणार आहे. 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली फलंदाजी करत विजय मिळवला होता. 2017 मध्ये इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करत भारतावर 9 धावांनी विजय मिळवला. मागील अंतिम सामन्यात पुन्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करत इंग्लंडला 71 धावांनी पराभूत केले. म्हणजेच, सलग तीन अंतिम सामन्यांमध्ये पहिली फलंदाजी करणाऱ्या संघानेच चषकावर कब्जा केला आहे. त्यामुळे यंदाही तीच परंपरा कायम राहते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डी. वाय. पाटील स्टेडियमवरील पिच नेहमीच फलंदाजांना अनुकूल असते. दिवसाच्या पहिल्या अर्ध्या भागात धावा सहज होतात, परंतु संध्याकाळी आर्द्रता वाढल्यावर गोलंदाजांना स्विंग आणि स्पिनचा थोडा फायदा होतो. त्यामुळे टॉस जिंकणाऱ्या संघासमोर मोठा निर्णय असेल फलंदाजी घ्यायची की गोलंदाजी. टॉस चुकीचा ठरल्यास संपूर्ण सामन्याची दिशा बदलू शकते, आणि इतिहास पाहता, पहिले फलंदाज होणेच अधिक फायदेशीर ठरले आहे.

भारतीय संघाने सेमीफायनल सामन्यात याच मैदानावर एक ऐतिहासिक विजय मिळवला होता. महिला वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठा रन चेस करत संघाने अंतिम फेरी गाठली. या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्यासारख्या खेळाडूंकडून आजही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका देखील कप जिंकण्यासाठी आतुर आहे आणि दोन्ही संघांमध्ये चुरशीची टक्कर होणार यात शंका नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com