IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध T20 मालिकेआधी भारताची चिंता वाढली, कर्णधाराच्या प्रकृतीबद्दल मोठा खुलासा
भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यानची पाच सामन्यांची टी20 मालिका 28 जूनपासून सुरू होत आहे. मात्र मालिकेआधी भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौर यांची तब्येत ठिक नसल्याची माहिती उपकर्णधार स्मृती मंधानाने दिली आहे.
भारताचा महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, 28 जून रोजी संध्याकाळी 7.30 वाजता मालिकेतील पहिला सामना होणार आहे. पत्रकार परिषदेला कर्णधार हरमनप्रीत अनुपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आलं होतं. पण स्मृती मंधानाने खुलासा करत सांगितले की, हरमनप्रीत केवळ थोडी अस्वस्थ आहे आणि ती पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे.
स्मृती मंधानाच्या मते, “हरमनप्रीतची तब्येत बरी नसल्यामुळे मी तिच्या वतीने पत्रकार परिषदेला हजर झाले. आम्ही आधीच येथे आलो असून गेल्या आठवड्यापासून सराव सुरु आहे. इंग्लंडच्या हवामानाला सामोरे जाण्यासाठी आणि स्थानिक खेळाच्या शैलीचा अभ्यास करण्यासाठी आमच्याकडे चांगला वेळ मिळाला.” तिने पुढे नमूद केले की, काही खेळाडू इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच खेळत आहेत, त्यामुळे त्यांनी या परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे. "पुढील वर्षी याच इंग्लंडमध्ये टी20 वर्ल्डकप होणार असल्याने ही मालिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मला खात्री आहे की संघ चांगली कामगिरी करेल," असेही ती म्हणाली.
भारतीय महिला संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, हरलीन देओल, सयाली सातघरे, स्नेह राणा, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, राधा यादव, श्री चरणी.