BCCI India vs Pakistan : "तर मी पाकिस्तानविरुद्ध खेळलो..." पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना व्हावा की नाही? माजी भारतीय खेळाडूच्या मताने वेधल लक्ष
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत भारताने क्रिकेट खेळावे की नाही, याबाबत देशभरात मतमतांतरे सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास मी वैयक्तिकरित्या तयार नसतो, असे ठाम वक्तव्य त्यांनी केले.
हरभजन म्हणाले, "मी जर वैयक्तिकरित्या त्या परिस्थितीत असतो, तर मी पाकिस्तानविरुद्ध खेळलो नसतो. मात्र, हा निर्णय खेळाडू आणि बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) यांचा आहे. त्यांना काय करायचं ते ते ठरवतील. मी फक्त माझं मत मांडलं आहे."
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, "मी कोणालाही सल्ला देण्याच्या भूमिकेत नाही. बीसीसीआय आणि खेळाडू मिळूनच अंतिम निर्णय घेतील. पण जर मला वैयक्तिक मत विचारलं असतं, तर मी नक्कीच खेळलो नसतो."
दरम्यान, पहलगाम हल्ल्यातील शहीद जवानांच्या बलिदानामुळे देशभरातून पाकिस्तानसोबतचे क्रिकेट संबंध तोडण्याची मागणी होत आहे. अनेक माजी खेळाडूंनीही अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात आता हरभजन सिंह यांनीही आपले मत मांडत पाकिस्तानविरुद्ध खेळणे टाळण्याची भूमिका घेतली आहे. हरभजन यांच्या या भूमिकेमुळे बीसीसीआय कोणता निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.