Women's World Cup 2025 : भारताचा विजयी झंझावात! स्मृती आणि प्रतिकाच्या शतकांनी न्यूझीलंडचा पराभव

Women's World Cup 2025 : भारताचा विजयी झंझावात! स्मृती आणि प्रतिकाच्या शतकांनी न्यूझीलंडचा पराभव

भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या उपांत्य फेरीत धमाकेदार प्रवेश केला आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या उपांत्य फेरीत धमाकेदार प्रवेश केला आहे. गुरुवारी, 23 ऑक्टोबर रोजी डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने न्यूझीलंडवर DLS पद्धतीनुसार 53 धावांनी मात केली.

या विजयाचं शिल्पकारपद ठरलं सलामीवीर स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांच्या अफलातून खेळीचं. दोघींनी मिळून पहिल्या विकेटसाठी तब्बल 201 चेंडूंमध्ये 212 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया भक्कम केला. प्रतिका रावलने 134 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांसह 122 धावा केल्या, तर स्मृती मानधनाने 95 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 109 धावांची शानदार खेळी केली.

त्यांच्या जोडीने भारताने 49 षटकांत 340 धावांचा डोंगर उभा केला. पावसामुळे सामन्यात थोडा व्यत्यय आला आणि DLS नियमानुसार न्यूझीलंडला 44 षटकांत 325 धावांचे लक्ष्य देण्यात आले. मात्र कीवी संघ 44 षटकांत 8 बाद 271 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

न्यूझीलंडकडून ब्रुक हॉलिडेने 84 चेंडूंमध्ये 81 धावा केल्या, तर इसाबेला गेजने नाबाद 65 धावा झळकावल्या. तरीही भारतीय गोलंदाजांच्या योजनाबद्ध माऱ्यासमोर त्यांची झुंज अपुरी ठरली. रेणुका सिंह ठाकूर आणि क्रांती गौड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून न्यूझीलंडचा डाव रोखला.

या सामन्यापूर्वी भारताला सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला होता. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून. मात्र, श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्धच्या विजयांनंतर न्यूझीलंडवर मिळालेला हा विजय भारताच्या पुनरागमनाची घोषणा ठरला.

या विजयामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने उपांत्य फेरीचे शेवटचे तिकीट मिळवले आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे चार संघ आता नॉकआउट फेरीत आमनेसामने येणार आहेत.

स्मृती आणि प्रतिकाच्या या धडाकेबाज खेळीने पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेटचं सामर्थ्य जगासमोर आणलं आहे. आता सगळ्यांच्या नजरा उपांत्य फेरीकडे लागल्या आहेत, जिथे भारत विजेतेपदासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com