Kartik Sharma : IPL 2026 कार्तिक शर्मावर कोट्यवधींची बोली, चेन्नईने केली मोठी गुंतवणूक; कोण आहे हा कार्तिक शर्मा?
(Kartik Sharma) आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात नव्या आणि तरुण खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याच लिलावात कार्तिक शर्मा या युवा क्रिकेटपटूवर मोठी रक्कम खर्च करण्यात आली. चेन्नई सुपर किंग्ज संघाने कार्तिकला तब्बल 14.20 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
कार्तिक शर्माची सुरुवातीची किंमत केवळ 30 लाख रुपये होती. मात्र लिलावादरम्यान त्याच्यासाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळाली आणि शेवटी त्याला 14.20 कोटींची मोठी बोली लागली. यामुळे तो आयपीएलमधील सर्वात महागड्या अनकॅप्ड खेळाडूंमध्ये गणला गेला आहे. चला तर मग, कार्तिक शर्मा नेमका कोण आहे आणि त्याच्यावर इतकी मोठी बोली का लागली, हे जाणून घेऊया.
चेन्नईला मिळाला भविष्यातील नवा पर्याय
कार्तिक शर्मा हा एक विकेट सांभाळणारा फलंदाज आहे. लिलावाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी बोली लावली होती. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनीही रस दाखवला. काही वेळाने लखनऊ माघार घेतली आणि शेवटी चेन्नई व कोलकाता यांच्यात जोरदार स्पर्धा झाली. अखेर चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारत 19 वर्षीय कार्तिकला आपल्या ताफ्यात घेतले. पुढील काळात तो चेन्नईकडून एमएस धोनीनंतर विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.
कार्तिक शर्मा कोण आहे?
कार्तिक शर्मा हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थान संघाकडून खेळतो. तो वेगाने धावा काढणारा आणि आक्रमक शैलीत फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 मध्ये त्याने राजस्थानसाठी 5 सामने खेळत 160 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 133 धावा केल्या होत्या. विशेषतः शेवटच्या षटकांमध्ये तो मोठे फटके मारून सामना फिरवण्याची क्षमता ठेवतो.
आकडेवारीही दमदार
कार्तिक शर्माने लहान वयातच अंडर-14 आणि अंडर-16 गटात राजस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. आतापर्यंत त्याने 12 टी-20 सामन्यांमध्ये एकूण 334 धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट सुमारे 163 आहे. विकेटकीपर आणि स्फोटक फलंदाज अशी दुहेरी भूमिका निभावण्याची क्षमता असल्यामुळेच चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यावर इतकी मोठी रक्कम खर्च केली आहे. भविष्यात तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

