Mohammed Siraj IND vs ENG : ओव्हलवर सिराजचा कहर! धोनीचा विक्रम मोडत सिराजने रचला नवा ऐतिहासिक विक्रम
इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने अपूर्व कामगिरी करत क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं. विशेषतः ओव्हल कसोटीत त्याने अफलातून गोलंदाजी करत सामन्याचा संपूर्ण प्रवाहच बदलून टाकला. या सामन्यात त्याने एकूण 9 विकेट्स घेत विजयात निर्णायक भूमिका बजावली आणि त्याच्या या दमदार प्रदर्शनाबद्दल त्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आलं.
सामन्याच्या पहिल्या डावात सिराजने 4 विकेट्स घेतल्या, ज्यासाठी त्याने 86 धावा दिल्या. दुसऱ्या डावात त्याने आणखी प्रभावशाली कामगिरी करत 104 धावांत 5 विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे एकूण 9 विकेट्स घेत सिराजने भारताच्या विजयाचा पाया मजबूत केला. प्रसिद्ध कृष्णानेही या कसोटीत उल्लेखनीय प्रदर्शन करत 8 विकेट्स मिळवल्या आणि टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
या मालिकेद्वारे मोहम्मद सिराजने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला. परदेशात सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारा भारतीय खेळाडू म्हणून त्याने माजी कर्णधार एम.एस. धोनीला मागे टाकले आहे. सिराजच्या नावावर आता परदेशात 12 कसोटी विजयांची नोंद झाली आहे, तर धोनीच्या खात्यात 11 विजय होते. सिराजने आतापर्यंत घराबाहेर 27 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी भारताने 12 जिंकले, 10 गमावले आणि 5 सामने अनिर्णित राहिले आहेत.
या कामगिरीसह सिराजने जसप्रीत बुमराहच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. बुमराहच्याही नावावर परदेशात 12 कसोटी विजय आहेत. त्यामुळे सिराजने आता भारताच्या परदेशातील सर्वात यशस्वी कसोटीवीरांमध्ये आपलं स्थान मजबूत केलं आहे. सिराजची ही कामगिरी केवळ सांघिक विजयातच नव्हे, तर वैयक्तिक यशातही मैलाचा दगड ठरली असून त्याने भारताच्या वेगवान गोलंदाजांची परंपरा अधिक उज्ज्वल केली आहे.