Mohsin Naqvi On Asia Cup Trophy : नकवीचा अभिमान तुटत नाहीये! BCCI च्या इशाऱ्याला न जुमानता स्वत:च्या निर्णयावर ठाम; म्हणाले, "BCCIने त्यांच्या कोणत्याही खेळाडूला..."
भारतीय संघाने अमिरात क्रिकेट बोर्डाच्या उपाध्यक्षांच्या हस्ते ट्रॉफी दिली जावी, अशी मागणी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करून मोहसीन नकवी स्वतःच ट्रॉफी घेऊन निघून गेले आणि आपल्या हॉटेलमध्ये थांबले. त्यांच्या या वर्तनामुळे वाद अधिक चिघळत गेला. त्यानंतर नकवी यांना बीसीसीआयने अल्टिमेटम देखील दिला होता. बीसीसीआयने मोहसिन नकवी यांना आशिया कप ट्रॉफी टीम इंडियाला देण्याची मागणी केली होती.
मात्र बीसीसीआयच्या मागणीला न जुमानता मोहसीन नकवी यांनी बीसीसीआयच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, श्रीलंका आणि अफगाणिस्तानसह इतर देशांच्या बोर्डांनी मागच्या आठवड्यात मोहसिन नकवी यांना पत्र लिहून आशिया कप ट्रॉफी टीम इंडियाला देण्याची मागणी केली होती.
यावर नकवी म्हणाले की, "बीसीसीआय इच्छित असल्यास त्यांच्या कोणत्याही खेळाडूला ट्रॉफी स्वीकारण्यासाठी पाकिस्तानच्या सादरीकरण समारंभात पाठवू शकते" त्यांनी दिलेल्या या उत्तरामुळे भारतीयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे की बीसीसीआय किंवा टीम इंडियाचा कोणताही सदस्य नकवीकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही.
बीसीसीआयने ट्रॉफी घेण्यासाठी दुबईला एक प्रतिनिधी पाठवावा अशी इच्छा नकवी यांच्याकडे व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मोहसिन नकवी त्यांच्या म्हण्यावर ठाम आहेत. आशिया कप ट्रॉफी सध्या दुबईतील एसीसी कार्यालयात ठेवण्यात आली आहे. आयसीसीच्या बैठकीत ट्रॉफीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.