Mohsin Naqvi On Asia Cup Trophy : "ट्रॉफी देईन पण पुन्हा एकदा....आयोजित करा", भारतीय संघाला ट्रॉफी देण्यापूर्वी नक्वीने समोर ठेवली अट

Mohsin Naqvi On Asia Cup Trophy : "ट्रॉफी देईन पण पुन्हा एकदा....आयोजित करा", भारतीय संघाला ट्रॉफी देण्यापूर्वी नक्वीने समोर ठेवली अट

आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला. मात्र सामना संपल्यानंतर पारितोषिक वितरण सोहळ्यात घडलेल्या प्रकारामुळे ट्रॉफीवरून नवा वाद निर्माण झाला आहे.
Published on

आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला. मात्र सामना संपल्यानंतर पारितोषिक वितरण सोहळ्यात घडलेल्या प्रकारामुळे ट्रॉफीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानी मंत्री मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी व पदके स्वीकारण्यास नकार दिला.

मोहसीन नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्याकडून ट्रॉफी न स्वीकारल्यामुळे ते संपूर्ण जगासमोर अपमानित झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी ट्रॉफी भारताला देण्यास सहमती दर्शवली, मात्र त्यासाठी अट घातली की पुन्हा एकदा समारंभ आयोजित करावा. पण प्रत्यक्षात असा समारंभ होण्याची शक्यता फार कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, "भारताविरुद्ध शत्रुत्व ठेवणाऱ्या देशाच्या मंत्र्याकडून ट्रॉफी स्वीकारणे योग्य ठरणार नाही. त्याचवेळी, ट्रॉफी आणि पदके कोणाच्या वैयक्तिक ताब्यात असणेही अयोग्य आहे. त्यामुळे या प्रश्नावर पुढील कारवाई एसीसी किंवा आयसीसीच्या पातळीवर होऊ शकते.

दरम्यान, पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी संपूर्ण मालिकेदरम्यान पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले होते. तसेच फायनलपूर्वी नाणेफेकीसाठी झालेल्या अधिकृत फोटोशूटमध्येही भारतीय संघ सहभागी झाला नव्हता. या घटनांमुळेच ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याची भूमिका आणखी ठळक झाली आहे.

आयसीसीच्या आचारसंहितेनुसार कर्णधाराने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणे हा मुद्दा चर्चेचा विषय ठरू शकतो. तथापि, या संदर्भात स्पष्ट नियम नसल्याने निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा अपेक्षित आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई ठरवली जाईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com