Mumbai Indians New Name : मुंबई इंडियन्स संघाबाबत मोठा निर्णय; संघाचे नाव बदलून नवं नाव ठेवणार, 'एमआय...'
मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने जागतिक स्तरावर आपला विस्तार वेगाने सुरू ठेवला आहे. आता इंग्लंडमधील लोकप्रिय द हंड्रेड क्रिकेट लीगमध्ये मोठी हालचाल घडली असून, मुंबई इंडियन्सने ओव्हल इनव्हिन्सिबल्स संघातील 49 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. या कराराची किंमत तब्बल 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.
यामुळे आता ओव्हल इनव्हिन्सिबल्स संघाचे नाव बदलून एमआय लंडन करण्यात येणार आहे. द टेलिग्राफच्या अहवालानुसार, हा बदल 2026 च्या हंगामापासून लागू होईल. सुरुवातीला सरे काउंटी क्लबला जुनं नाव ठेवायचं होतं, मात्र अखेर पुढील हंगामात ‘एमआय लंडन’ या नावाने हा संघ खेळताना दिसणार आहे. सध्या या संघातील 51 टक्के हिस्सा सरे क्लबकडे राहणार आहे, तर 49 टक्के हिस्सा मुंबई इंडियन्स फ्रँचायझीकडे असेल.
या करारानंतर मुंबई इंडियन्सकडे जगभरात तब्बल सहा संघ झाले आहेत. भारतातील इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स हा प्रमुख संघ असून, महिला प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) देखील एमआयचा संघ आहे. अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटमध्ये एमआय न्यूयॉर्क, दक्षिण आफ्रिकेच्या एसए 20 लीगमध्ये एमआय केप टाउन, आंतरराष्ट्रीय लीग टी20 (आयएलटी20) मध्ये एमआय एमिरेट्स आणि आता इंग्लंडच्या द हंड्रेडमध्ये एमआय लंडन हा संघ मुंबई इंडियन्सच्या मालकीचा झाला आहे.
मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या या जागतिक गुंतवणुकीमुळे त्यांचा ब्रँड अधिक मजबूत झाला आहे. आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फ्रँचायझीने आता जगभरात पाय रोवले आहेत. त्यामुळे आगामी काळात मुंबई इंडियन्सकडून अजून अनेक लीगमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.