Suryakumar Yadav | Asia Cup 2025 Final : "या स्पर्धेतील माझे सामना शुल्क....मदत देणार" टीम इंडियाच्या विजयानंतर कॅप्टन सूर्याचा उदार निर्णय
28 सप्टेंबर रोजी दुबई स्टेडिअममध्ये पार पडलेल्या आशिया कप 2025 स्पर्धेच्या भारत-पाकिस्तान या हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने आपली शानदार कामगिरी दाखवत पाकिस्तानला पराभूत केलं. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, अन् पाकिस्तानला 5 गडी राखून घरचा रस्ता दाखवला.
यावेळी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने मोठी घोषणा केली आहे. त्याने सामना जिंकल्यानंतर आपल्या ट्वीटर अकाउंटला एक पोस्ट शेअर करत सर्व भारतीयांची मनं जिंकली आहेत. या सामन्यादरम्यान प्रत्येक खेळाडूला एक ठरावीक रक्कम मॅच फीस म्हणून दिली जाते. यावेळी सूर्यकुमार यादवला देण्यात आलेले सामना शुल्क तो भारतीय सैन्यदल आणि पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना देणार असल्याच समोर आलं आहे.
सूर्यकुमार यादवने एक्स पोस्टमध्ये काय म्हटलं?
"मी या स्पर्धेतील माझे सामना शुल्क आपल्या सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही नेहमीच माझ्या विचारांमध्ये राहता", असं सूर्यकुमार यादवने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सूर्यकुमार यादव किती रक्कम मदत म्हणून देणार?
बीसीसीआयकडून भारतीय खेळाडूंना वार्षिक कराराशिवाय एका टी-20 सामन्यांसाठी 3 लाख रुपये सामना शुल्क दिले जातात. नुकत्याच पार पडलेल्या आशिया कप 2025 या स्पर्धेत टीम इंडियाने 7 सामने खेळले, त्या आकडेवारीनुसार सूर्यकुमार यादवला 21 लाख रुपये दिले जाऊ शकतात. या हिशोबाने सूर्यकुमार यादव हे 21 लाख रुपये मदत म्हणून देणार असल्याचं स्पष्ट आहे. मात्र सूर्यकुमार यादवने अद्याप मदतीचा आकडा सांगितला नाही. पण तो आकडा 21 लाख रुपये असू शकतो हे जगजाहीर आहे.