Yash Dayal : RCB संघातील या खेळाडूवर गंभीर आरोप; लग्नाचं आमिष अन् 5 वर्ष शोषण, महिलेने सांगितलं...
IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या विजेतेपदात मोलाचा वाटा उचलणारा वेगवान गोलंदाज यश दयाल आता मोठ्या अडचणीत सापडला आहे. एका महिलेने त्याच्यावर लग्नाचं आमिष दाखवून मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेनं एफआयआर दाखल केला असून, तक्रार थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयातही सादर करण्यात आली आहे.
पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "मागील पाच वर्षांपासून मी यश दयालसोबत नात्यात होते. दोघांचे कुटुंबीयही एकमेकांना भेटले होते. मात्र या काळात त्याने माझा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केला." महिलेच्या म्हणण्यानुसार, यशने तिला लग्नाचं वचन देऊन विश्वास संपादन केला, आणि दीर्घ काळ संबंध ठेवले. तिने सादर केलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे की, तिच्याकडे यशसोबतचे संभाषणाचे चॅट्स, व्हिडीओ कॉल्स, स्क्रीनशॉट्स आणि इतर महत्त्वाचे पुरावे आहेत. या पुराव्यांच्या आधारे तिने केलेले आरोप सिद्ध होऊ शकतात, असंही ती म्हणाली
महिलेने दावा केला आहे की, "यश दयालचे इतर काही महिलांसोबतही अशाच प्रकारचे संबंध होते." सध्या ती आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अडचणीत असल्याचंही तिने नमूद केलं. त्यामुळेच शेवटी तिला मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार करण्याची वेळ आली. दरम्यान, यश दयाल किंवा RCB संघ व्यवस्थापनाकडून या प्रकरणावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
यश दयालने IPL कारकीर्दीची सुरुवात 2022 साली गुजरात टायटन्स संघातून केली होती. त्या वर्षी गुजरातने विजेतेपद मिळवलं होतं. 2024 पासून तो RCB संघात खेळत आहे. 2025 मध्ये RCB च्या विजयानंतर त्याच्या कामगिरीचं मोठं कौतुक झालं होतं. सध्या पोलीस याप्रकरणी चौकशी करत असून पुढील कायदेशीर कारवाईची वाट पाहिली जात आहे.