Virat Kohli : IPL तर जिंकली, पण निवृत्तीबाबत विराटचं महत्त्वाचं विधान; "माझ्या खेळाचा शेवट..."
आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदाच जेतेपद पटकावले आणि या ऐतिहासिक क्षणानंतर विराट कोहली भावूक झाला. अंतिम स्फोटक सामना जिंकल्यानंतर विराट मैदानातच गुडघ्यावर बसला, डोकं खाली टेकवलं आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. १८ वर्षे RCBसाठी खेळलेल्या आणि १८ क्रमांकाची जर्सी परिधान करणाऱ्या विराटसाठी आयपीएलच्या १८ व्या पर्वातच ट्रॉफी मिळणं, हा अनोखा योगायोग ठरला.
बंगळुरूनं प्रथम फलंदाजी करत १९० धावा उभारल्या, तर पंजाब किंग्सला १८४ धावांत रोखत ६ धावांनी विजय मिळवला. विराटसह संपूर्ण संघाला हा क्षण फारच खास होता. सामन्यानंतर विराट म्हणाला, “ही ट्रॉफी संघाइतकीच आमच्या चाहत्यांचीही आहे. १८ वर्षे आम्ही हीच स्वप्न पाहत होतो. आज ते साकार झालं.”
आंतरराष्ट्रीय टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्त झालेल्या विराटबाबत आयपीएल जिंकल्यानंतर निवृत्तीची चर्चा रंगली. मात्र, विराटने स्पष्ट केलं की, तो अजूनही मैदानावर पूर्ण ताकदीने खेळू इच्छितो. "या खेळासाठी माझ्याकडे फार वर्ष राहिलेली नाही. आमच्या कारकिर्दीची End Date असते. माझ्या खेळाचा शेवट कधी होईल हे मला माहित नाही, पण जेव्हा निवृत्त होईन, तेव्हा अभिमानानं सांगू शकेन की मी संघासाठी सर्व दिलं," असंही तो म्हणाला.
"मी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून नव्हे, तर पूर्ण 20 षटकांचा अनुभव घेणारा खेळाडू आहे. देवाने मला ज्या ताकदीनं आणि दृष्टिकोनानं आशीर्वाद दिला, त्याला मी न्याय देतोय," अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. विराटसाठी ही केवळ ट्रॉफी नव्हती, तर १८ वर्षांच्या निष्ठेचं फळ होतं. ही ट्रॉफी म्हणजे केवळ एका विजयानं सजलेला क्षण नाही, तर विराट कोहलीच्या १८ वर्षांच्या संघर्ष, निष्ठा आणि स्वप्नांची पूर्णता आहे. विराटचा अश्रूंमध्ये न्हालेला तो क्षण केवळ चाहत्यांच्या हृदयात नाही, तर क्रिकेटच्या इतिहासात कायमचा कोरला गेला. आता RCB विजेता आहे, आणि विराट कोहली आणि त्याचा संघ या विजया मागचे खरे शिलेदार आहेत.