Sanjay Raut On Team India : "ट्रॉफी नाकारणे हा ढोंगीपणा" पाकिस्तानकडून ट्रॉफी नाकारणाऱ्या भारतीय संघावर राऊतांची टीका
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला. यानंतर मोठी चर्चा रंगली ती म्हणजे भारतीय संघाने पाकिस्तानचे मंत्री व आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार केलेला. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी टीम इंडियावर आणि क्रिकेट प्रशासनावर सडकून टीका केली आहे.
राऊत म्हणाले, "ही केवळ नौटंकी आहे. तुम्ही ज्यांच्यासोबत फोटो काढता, हस्तांदोलन करता, त्यांच्याकडून ट्रॉफी नाकारणे हा ढोंगीपणा आहे. पंधरा दिवसांपूर्वी मोहसीन नक्वी यांच्यासोबत तुम्ही मैत्रीपूर्ण वागत होता आणि आता देशासमोर देशभक्तीचे नाटक करत आहात. अखेर तुम्ही लोकांना मूर्ख बनवताय का?"
त्यांनी पुढे टीका करताना प्रश्न उपस्थित केला की, "तुम्ही सामना खेळलात ना, मग ट्रॉफी नाकारणे म्हणजे नेमकं काय संदेश देत आहात? लोकांचा विरोध असूनही तुम्ही पाकिस्तानसोबत खेळताय. हे प्रामाणिकपणे सांगा. की पंतप्रधानांकडूनच देशाला मूर्ख बनवायची प्रेरणा घेतली आहे?"
यासोबतच राऊत यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या कामकाजावरही हल्ला चढवला. ते म्हणाले, "जय शाह आल्यापासून महाराष्ट्रातील खेळाडू भारतीय संघात क्वचितच दिसतात. हे पद्धतशीरपणे केले जात आहे. क्रिकेटमधून महाराष्ट्राला दूर करण्याचे काम सुरू आहे आणि याचा निषेध व्हायलाच हवा."
आशिया कपमधील या विजयानंतरचा ट्रॉफी नकार प्रकरण केवळ क्रीडा विश्वापुरते मर्यादित न राहता आता राजकीय वादळाचे रूप धारण करत आहे. टीम इंडियाचा हा निर्णय योग्य की अयोग्य, यावर आगामी दिवसांत नवी चर्चा रंगण्याची शक्यता आहे.