IND vs AUS : रोहित-विराटसह बुमराहला ही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान नाही; भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीची लाट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी वनडे मालिकेच्या पार्श्वभूमीवर एक अनपेक्षित घडामोड घडली आहे, जी क्रीडाजगताच्या चर्चेचा विषय ठरली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने एका टेलिव्हिजन शोमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वकालीन संयुक्त प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. मात्र त्याच्या या निवडीतून भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना डावलण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून चाहत्यांचा संताप उफाळून आला आहे.
कमिन्सच्या या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकूण 11 खेळाडूंपैकी 8 खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि केवळ 3 भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे यामधील भारतीय खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर, झहीर खान आणि महेंद्रसिंह धोनी – तिघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले.
सलामीसाठी डेविड वॉर्नरसोबत सचिन तेंडुलकर, मधल्या फळीत रिकी पॉन्टिंग, स्टीव स्मिथ, शेन वॉटसन आणि मायकल बेवन यांना संधी. यष्टीरक्षक म्हणून धोनीची निवड, तर गोलंदाजीसाठी शेन वॉर्न, ब्रेट ली, झहीर खान आणि ग्लेन मॅकग्रा यांचा समावेश करण्यात आला आहे.
कमिन्सच्या निवडीतून रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघं वगळले गेल्याने भारतीय फॅन्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही, तर सध्या भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराह हाही यामध्ये सामील नाही. अनेक चाहत्यांनी या निवडीला “अन्यायकारक” आणि “एकतर्फी” अशी टीका केली आहे.
19 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेआधी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने असा माईंड गेम खेळण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या भारताच्या वनडे संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश असून, 2027 च्या विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून ही मालिका त्यांच्यासाठी महत्त्वाची मानली जाते.
दरम्यान, शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकण्याचा प्रयत्न करताना भारताला अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागणार आहे. एकूणच, पॅट कमिन्सच्या या निवडीमुळे चर्चेला नवा आयाम मिळाला आहे. हे केवळ एक वैयक्तिक मत आहे की मानसिक दबाव निर्माण करण्याचा डाव, याचं उत्तर लवकरच मैदानात मिळेल.