Mumbai Kanga League : नारळ फोडला, हात जोडले... सामन्यापूर्वी 'या' मुस्लिम क्रिकेटपटूचा मैदानावरील व्हिडिओ व्हायरल
सध्या सर्वत्र क्रिकेटचे वारे वाहत आहेत. इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडिया आता आशिया कप 2025 आणि वनडेसाठी सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबईत देखील दरवर्षी कांगा लीग आयोजित केली जाते. यंदाची कांगा लीग 10 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. यादरम्यान कांगा लीग सुरु होण्यापुर्वी मैदानातील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यावेळी मुस्लिम खेळाडू शम्स मुलानी या क्रिकेटपटूने मैदानात विकेट आणि खेळपट्टीची पारंपरिक रित्या नारळ फोडून आणि दोन्ही हात जोडून पूजा केली. त्याने सर्वप्रथम मैदानावर मिठाई आणली, फुले इत्यादी अर्पण केली आणि नंतर हात जोडत प्रार्थना केली. विकेटसमोर नारळ फोडला आणि त्याचे पाणी विकेटवर शिंपडले.शम्स मुलानी हा आयपीएलमध्ये देखील खेळला आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचा भाग आहे.
क्रिकेट तसेच कोणत्याही खेळात खेळाडूचा जात किंवा धर्म विचारात न घेता त्याला आपलं कौशल्य दाखवण्याची संधी दिली जाते. प्रत्येक खेळात खेळाडू एकमेकांच्या धर्माचा आणि चालीरीतींचा आदर करतात. यावेळी ते मुंबईतील कांगा लीगमध्ये पाहायला मिळाले. कारण, 28 वर्षीय क्रिकेटपटू शम्स मुलानीने हिंदू परंपरेनुसार क्रिकेटला मानसन्मान देत पूजा केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.