Rohit Sharma ODI Retirement : "पुढील दोन वर्षांत..." रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीबाबत प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

Rohit Sharma ODI Retirement : "पुढील दोन वर्षांत..." रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीबाबत प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्माने जवळपास सर्व क्रिकेट फॉर्मेटमधून त्याची निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता तो वनडे फॉर्मेटमधून कधी निवृत्ती घेणार? याबाबत त्याच्या प्रशिक्षकांनी मोठा खुलासा केला आहे.
Published on

टीम इंडियाचा अनुभवी आणि स्टार फलंदाज कर्णधार रोहित शर्मा सध्या फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. याआधी त्याने टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आता प्रश्न निर्माण झाला आहे, तो वनडे फॉर्मेटमधून कधी निवृत्ती घेणार? याबाबत त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी स्पष्ट माहिती दिली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी केली, मात्र काही महत्त्वाच्या अंतिम सामन्यांत पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 आणि वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये भारत उपविजेता ठरला. तथापि, 2024 मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला आणि त्यानंतर त्याने या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. चॅम्पियन्स ट्रॉफीही भारताच्या झोळीत पडली, पण कसोटी क्रिकेटमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही आणि अंतिम फेरी गाठण्याआधीच रोहितने कसोटीतून निवृत्ती घेतली.

रोहित शर्माचे लहानपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी गौरव मंगलानी यांच्या पॉडकास्टवर सांगितले की, "रोहित शर्मा आता 2027 वनडे वर्ल्डकप जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यांचा विश्वास आहे की, त्या वर्ल्डकपनंतर रोहित वनडे क्रिकेटलाही रामराम ठोकणार. 2027 चा वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहे. म्हणजेच अजून दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असून, या काळात रोहितला सातत्यपूर्ण फॉर्म राखणे महत्त्वाचे ठरणार आहे".

"या दरम्यान भारताच्या वनडे मालिकांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे खेळाच्या संधी कमी असल्या तरी, वर्ल्डकपसाठी संघाला तयार ठेवणे आणि स्वतःची कामगिरी सर्वोच्च पातळीवर नेणे ही रोहितसमोरची मोठी आव्हाने आहेत. सध्या तो भारतीय संघाचा कर्णधार आहे, मात्र पुढील दोन वर्षांत परिस्थितीत काय बदल होईल हे सांगणे अवघड आहे. थोडक्यात, रोहित शर्माचे लक्ष्य आता एकच 2027 वनडे वर्ल्डकप जिंकणे. त्या यशानंतरच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पूर्णविराम देईल, असा त्याच्या प्रशिक्षकाचा दावा आहे".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com