Divya Deshmukh : मराठमोळ्या दिव्या देशमुखची ऐतिहासिक कामगिरी; FIDE विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक
(Divya Deshmukh) भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे. मराठमोळ्या दिव्या देशमुख हिने चीनच्या माजी विश्वविजेत्या आणि सध्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या तान झोंगयी हिला उपांत्य फेरीत हरवत FIDE महिला वर्ल्ड कप 2025 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या कामगिरीसह दिव्या ही अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे.
ही लढत अत्यंत चुरशीची होती. मात्र शेवटी संयम आणि मानसिक ताकदीच्या जोरावर दिव्याने बाजी मारली. तिचा हा सलग तिसरा ग्रँडमास्टरविरुद्धचा विजय ठरला. या विजयानंतर तिने 2026 मध्ये होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून तिला तिचा पहिला ग्रँडमास्टर नॉर्म देखील प्राप्त झाला आहे.
दिव्याचा अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी गुरुवारी निश्चित होईल. भारताची कोनेरु हम्पी आणि चीनची लेई टिंगजी यांच्यातील सामना टायब्रेकपर्यंत गेला असून त्याचा निकाल लवकरच लागणार आहे.
दिव्याने याआधीही आपली क्षमता सिद्ध केली आहे. तिने U-10 आणि U-12 जागतिक विजेतेपद मिळवले असून 2024 मध्ये तिने U-20 वर्ल्ड जूनियर चॅम्पियनशिपमध्ये 10/11 गुणांसह विजय मिळवला. भारताच्या ऑलिंपियाड सुवर्णपदकातही तिचा मोलाचा वाटा होता.