ENG vs SL: दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर 190 धावांनी केली मात
वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा 190 धावांनी पराभव केला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. विजयासाठी विश्वविक्रमी 483 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात 292 धावांत सर्वबाद झाला. इंग्लंडकडून ऍटकिन्सनने पाच विकेट घेतल्या. गेल्या आठवड्यात मँचेस्टरमध्ये झालेल्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला होता. तिसरा सामना शुक्रवारपासून ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने या सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावून संघाच्या मोठ्या विजयाचा पाया रचला. तत्पूर्वी, 2 बाद 53 धावांवर दिवसाची सुरुवात केल्यानंतर श्रीलंकेने प्रभात जयसूर्याची (चार) विकेट लवकर गमावली. ख्रिस वोक्सच्या चेंडूवर तो दुसऱ्या स्लिपवर झेलबाद झाला. त्यानंतर करुणारत्ने आणि अँजेलो मॅथ्यूज (36) यांनी 55 धावांची भागीदारी करून डाव पुढे केला. करुणारत्नेने कसोटीतील 54 वे अर्धशतक झळकावल्यानंतर, ऑली स्टोनचा उसळणारा चेंडू हाताळण्यात तो अपयशी ठरला आणि चेंडू त्याच्या ग्लोव्हजला लागला आणि यष्टीरक्षक जेमी स्मिथच्या हातात गेला. लंच ब्रेकनंतर मॅथ्यूजने सावध फलंदाजी केली तर दिनेश चंडिमल (58) याने आक्रमक पध्दत अवलंबली. शोएब बशीरने मॅथ्यूजला बाद करून दोघांमधील 59 धावांची भागीदारी मोडली. कव्हर एरियात वोक्सला सोपा झेल देऊन मॅथ्यूज पॅव्हेलियनमध्ये परतला.
पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या गस ऍटकिन्सनने नंतर चंडीमल आणि कामिंडू मेंडिस (चार) यांना बाद करून इंग्लंडचा विजय जवळपास निश्चित केला. त्याने चहापानानंतर मिलन रत्नायके (43) सोबत आठव्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी मोडून कर्णधार धनंजय डी सिल्वाची 50 धावांची खेळी संपुष्टात आणली. त्यानंतर ॲटकिन्सनने रत्नायकेला बाद करत पाचवे यश संपादन केले. इंग्लंडकडून वोक्स आणि स्टोनने प्रत्येकी दोन गडी बाद केले.