Glenn Maxwell Double Century Record: जखमी शेर ग्लेन मॅक्सवेलच्या द्विशतकाने ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

Glenn Maxwell Double Century Record: जखमी शेर ग्लेन मॅक्सवेलच्या द्विशतकाने ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

मंगळवारी 7 नोव्हेंबर रोजी जगभरातील क्रिकेटरसिकांना विश्वचषकातील एक संस्मरणीय व झुंजार द्विशतक पहावयास मिळाले.
Published by :
Team Lokshahi

मंगळवारी 7 नोव्हेंबर रोजी जगभरातील क्रिकेटरसिकांना विश्वचषकातील एक संस्मरणीय व झुंजार द्विशतक पहावयास मिळाले. सामनावीराचा मानकरी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने नोंदवलेल्या वादळी नाबाद द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 19 चेंडूत बाकी ठेवत अफगाणचा 3 गड्यांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची स्थिती 7 बाद 91 अशी झाली, तेव्हा अफगाण आणखी एका विश्वविजेत्या संघाला धक्का देणार, हे निश्चित वाटत होते. पण मॅक्सवेलने आठव्या गड्यासाठी कर्णधार कमिन्ससमवेत नाबाद 202 धावांची झुंजार व तुफानी भागीदारी करीत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. दोन जीवदानाचा लाभ घेत त्याने केवळ 128 चेंडूत 21 चौकार व 10 षटकारांची आतषबाजी करीत वैयक्तिक व विश्वचषकातील दुसरे द्विशतक नोंदवले. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोणत्याही खेळाडूने नोंदवलेले हे पहिलेच द्विशतक आहे. त्याला क्रॅपचा त्रास होऊ लागल्याने त्या वेदनांवर मात करीत त्याने झुंजार फलंदाजी केली. त्याची ही खेळी दीर्घकाळ क्रिकेटरसिकांच्या स्मरणात राहील, हे निश्चित आहे. त्याला साथ देणारा कमिन्स 12 धावांवर नाबाद राहिले. त्याने 68 चेंडू किल्ला लढतीत मॅक्सवेलला उत्कृष्ट साथ दिली आणि ऑस्ट्रेलियातर्फे आठव्या गड्यासाठी अभेद्य 202 धावांची सर्वोच्च भागीदारी नोंदवली. त्यांनी शेन वॉर्न व पॉल रॅफेल यांनी नोंदवलेला 119 धावांचा विक्रम मागे टाकला.

नूर अहमदने त्याला दिलेले सोपे जीवदान अफगाणला खूप खूप महाग पडले. पराभवामुळे इब्राहिम झद्रनने नोंदवलेले पहिले वर्ल्ड कप शतक आणि रशिद खानची अष्टपैलू खेळीही वाया गेली. अफगाणच्या नवीन उल हक, अझमतुल्लाह, रशिद खान यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. पण नंतर ते मॅक्सवेलच्या फटकेबाजीसमोर पूर्णत: निष्प्रभ ठरले. अफगाणचा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तर ऑस्ट्रेलियाचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com