Hardik Pandya: 6,6,6,6,6,6,4; सहा चेडूत 34 धावा, हार्दिक पांड्याची वीजेच्या वेगाने झळकणारी शतकी खेळी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
फलंदाजी कोसळलेली, स्कोअरबोर्ड दबावाखाली आणि प्रतिस्पर्धी गोलंदाज आत्मविश्वासात अशा परिस्थितीत मैदानात उतरलेला खेळाडू जर सामना फिरवतो, तर त्याला खास दर्जा मिळतो. विजय हजारे ट्रॉफी 2025 मध्ये हार्दिक पंड्याने असाच खास क्षण निर्माण केला. विदर्भाविरुद्धच्या सामन्यात त्याने बडोद्याच्या डावाला नवसंजीवनी देत धडाकेबाज शतक झळकावले.
बडोद्याची अडचण… आणि हार्दिकचा प्रवेश
विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि सुरुवातीपासूनच बडोद्यावर दबाव टाकला. अवघ्या 71 धावांत 5 गडी बाद झाल्याने बडोद्याचा डाव कोलमडण्याच्या मार्गावर होता. याच क्षणी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला हार्दिक पंड्या मैदानात उतरला आणि सामन्याची दिशा हळूहळू बदलू लागली. भाऊ कृणाल पंड्यासोबत सहाव्या विकेटसाठी 65 धावांची महत्त्वाची भागीदारी करत हार्दिकने आधी डाव सावरला आणि त्यानंतर आक्रमकतेचा गिअर टाकला.
जो समोर येईल, तो धुलाईला तयार!
हार्दिक पंड्याच्या फलंदाजीचा वेग वाढत गेला तसा विदर्भाचा मारा विस्कळीत झाला. चौकार-षटकारांचा पाऊस सुरू झाला आणि मैदानात प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने ‘हार्दिक शो’ पाहायला मिळाला. 92 चेंडूत 133 धावा, 11 षटकार आणि 8 चौकार, तर 144.57 चा स्ट्राईक रेट ही आकडेवारीच त्याच्या वादळी खेळीची साक्ष देणारी ठरली.
39वं षटक ठरलं निर्णायक
या डावातील सर्वात लक्षवेधी क्षण आला तो विदर्भाच्या 39व्या षटकात. गोलंदाज पी. आर. रेखाडे यांच्या एका षटकात हार्दिक पंड्याने अक्षरशः धुव्वा उडवला.
6, 6, 6, 6, 6, 4 तब्बल 34 धावा
हे षटक खेळण्याआधी हार्दिक 62 चेंडूत 66 धावांवर होता. मात्र षटक संपेपर्यंत त्याने शतक पूर्ण करत मैदान दणाणून सोडलं. हा क्षण सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
पहिलं लिस्ट ‘ए’ शतक, तेही दमदार
हा डाव हार्दिक पंड्यासाठी ऐतिहासिक ठरला.
त्याने लिस्ट ‘ए’ कारकिर्दीतील पहिले शतक अवघ्या 68 चेंडूत पूर्ण केले. इतक्यावर न थांबता त्याने शतकानंतरही आक्रमण सुरूच ठेवले आणि करिअरमधील सर्वोच्च 133 धावांची खेळी साकारली. याआधी त्याची सर्वोत्तम लिस्ट ‘ए’ कामगिरी नाबाद 92 धावांची होती.
बडोद्याचा सन्मानजनक स्कोअर
हार्दिकच्या या झंझावाती खेळीमुळे बडोदा संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 293 धावांपर्यंत मजल मारली. एकवेळ 250 चा आकडाही कठीण वाटत असताना, हा स्कोअर पूर्णपणे हार्दिक पंड्याच्या खेळीचा परिणाम होता.
