Ind Vs. Eng : भारताचा सर्व बाद 365 धावा, वॉशिंग्टन सुंदरचे शतक हुकले
गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताने सर्व बाद 365 धावा केल्या. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले. तो 96 धावांवर नाबाद राहिला. भारताने एकूण 160 धावांची आघाडी घेतली आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताकडे 89 धावांची आघाडी होती. भारताने 7 बाद 294 धावसंख्येवरून भारताने आज (6 मार्च) खेळायला सुरुवात केली. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांनी शतकी भागीदारी रचत डावाला आकार दिला. अर्धशतकाच्या जवळ असताना अक्षर धावबाद झाला. त्याने 5 चौकार आणि एका षटकारासह 43 धावा केल्या. त्यानंतर बेन स्टोक्सने इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज या शेवटच्या फलंदाजांना शून्यावर गुंडाळले. त्यामुळे दुसऱ्या बाजूला असलेल्या सुंदरला शतकाशिवाय तंबूत परतावे लागले. इंग्लंडकडून पहिल्या डावात बेन स्टोक्सने 4, जेम्स अँडरसनने 3 तर, जॅक लीचने 2 बळी घेतले.
भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या इंग्लंड संघाला पहिल्या डावात 205 धावांवर तंबूत धाडले होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या पात्रतेसाठी भारताला हा सामना जिंकणे किंवा ड्रॉ करणे आवश्यक आहे.