Cricket Retirement
KRISHNAAPPA GAUTAM RETIRES FROM CRICKET AHEAD OF T20 WORLD CUP 2026

Cricket Retirement: टी-20 वर्ल्ड कपआधी भारतीय क्रिकेटला धक्का; 'या' खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

Krishnaappa Gautam: टी-20 वर्ल्ड कप 2026 आधी भारतीय क्रिकेटला धक्का; अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतमने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

आगामी आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाकडून एकमेव आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, ज्याचा पदार्पणाचा सामना झाला, तोच त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील शेवटचा सामना ठरला.

टी-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे या स्पर्धेचे यजमान आहेत. या स्पर्धेसाठी 20 डिसेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ही गतविजेता म्हणून मैदानात उतरणार आहे. मात्र, या तयारीदरम्यानच कृष्णप्पा गौतमच्या निवृत्तीने चर्चेला उधाण आले आहे.

कृष्णप्पा गौतमने 2021 साली श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या मालिकेत संजू सॅमसन, राहुल चाहर, चेतन सकारिया आणि नितीश राणा यांच्यासोबत त्यालाही संधी मिळाली होती. मात्र, या पहिल्याच सामन्यानंतर गौतमला पुन्हा कधीही आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळाले नाही. त्या एकमेव सामन्यात त्याने 1 विकेट घेतली होती आणि फलंदाजी करताना 2 धावा केल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय संधी मिळाली नसली, तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कृष्णप्पा गौतमची कारकीर्द भक्कम राहिली. त्याने कर्नाटककडून सातत्याने खेळताना 59 फर्स्ट क्लास सामन्यांत 224 विकेट्स घेतल्या आणि 1,419 धावा केल्या. लिस्ट ‘ए’ क्रिकेटमध्ये 68 सामन्यांत 96 विकेट्स आणि 630 धावा, तर टी-20 क्रिकेटमध्ये 92 सामन्यांत 734 धावा आणि 74 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. आयपीएलमध्येही गौतमने आपली छाप सोडण्याचा प्रयत्न केला.

राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांकडून त्याने एकूण 36 सामने खेळले. या सामन्यांत त्याने 21 विकेट्स घेतल्या आणि 247 धावा केल्या. तो चेन्नई सुपर किंग्सच्या संघातही होता, मात्र तिथे त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. मर्यादित आंतरराष्ट्रीय कारकीर्द असली तरी देशांतर्गत आणि आयपीएलमधील योगदानामुळे कृष्णप्पा गौतमचा प्रवास लक्षात राहणारा ठरतो. क्रिकेटला अलविदा करताना त्याने शांतपणे मैदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, त्याची ही निवृत्ती अनेक क्रिकेट चाहत्यांसाठी भावनिक ठरते आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com