Tokyo Olympic | मिराबाई चानू होणार पोलीस अधिकारी !
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या मिराबाई चानू आता मणिपूरच्या पोलीस विभागात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाकडून पोलीस विभागात अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिराबाई चानूने टोक्यो ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. तिने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले आणि समस्त भारतीयांना सुखद भेट दिली. या कामगिरीनंतर मिराबाईवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. ती नुकतीच मायदेशी परतली आहे. यामध्ये दिल्ली एयरपोर्टवर तिचे कौतुक करण्यात आले.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी एक कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. तिला नव्या नोकरीची ऑफर दिली जाणार असल्याचेही सांगितले होते.एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मणिपूर सरकारने मिराबाईला हे पद दिले आहे. मणिपूरच्या या पोलादी महिलेने एकूण २०२ किलो वजन उचलण्याची कामगिरी करताना कुठेही चेहऱ्यावरील आत्मविश्वास कमी पडू दिला नाही. तिने ८७ किलो स्नॅच प्रकारात तर ११५ किलो क्लीन अॅण्ड जर्क प्रकारात वजन उचलले.