MS Dhoni Latest News Update
MS Dhoni Latest News Update

धोनीनं कर्णधारपद सोडण्याबाबत आधीच दिले होते संकेत, 'ती' पोस्ट झाली होती तुफान व्हायरल

४२ वर्षांच्या धोनीनं कर्णधारपद सोडण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच दिले होते. ४ मार्च २०२४ ला धोनीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.
Published by :

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा थरार उद्यापासून रंगणार असून चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. तत्पूर्वी, सीएसकेच्या संघात मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. या हंगामात ऋतुराज गायकवाडच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली आहे. महेंद्रसिंग धोनीऐवजी ऋतुराज गायकवाड सीएसकेचं नेतृत्व करणार आहे. ऋतुराज चेन्नईचा चौथा कर्णधार असणार आहे. याआधी धोनीशिवाय रवींद्र जडेजा आणि सुरेश रैनानं सीएसकेचं कर्णधारपद भूषवलं होतं. धोनीने एकूण २३५ सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी कॅप्टन्सी केली आहे. यामध्ये चेन्नईने १४२ सामन्यांमध्ये विजय मिळवला असून ९० सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. एक सामना बरोबरीत झाला, तर दोन सामने अनिर्णीत राहिले.

४२ वर्षांच्या धोनीनं कर्णधारपद सोडण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच दिले होते. ४ मार्च २०२४ ला धोनीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये धोनीनं लिहिलं होतं, नवीन हंगाम आणि नव्या भूमिकेसाठी प्रतीक्षा करु शकत नाही. आता १७ दिवसानंतर ऋतुराजच्या कॅप्टन्सीची घोषणा केल्यानंतर संस्पेन्स संपला आहे. म्हणजेच कर्णधारपद सोडण्याबाबत धोनीनं ठरवलं होतं आणि धोनी आता आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे.

आयपीएल २०२२ मध्येही सीएसकेनं नवीन कर्णधाराची एक दिवस आधीच घोषणा केली होती. तेव्हा रवींद्र जडेजाला संघाचं कर्णधारपद देण्यात आलं होतं. परंतु, सीएसकेचा कर्णधार म्हणून जडेजा खरा उतरला नाही. जडेजाच्या नेतृत्वात सीएसकेला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर पुन्हा धोनीला कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी देण्यात आली होती.

धोनीच्या नेतृत्वात सीएसकेनं जिंकले पाच IPL किताब

एम एस धोनीनं १५ ऑगस्ट २०२० ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. परंतु, धोनीनं आयपीएलमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. २००७ चा टी-२० वर्ल्डकप, २०११ चा वर्ल्डकप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी, अशा तीन आयसीसी ट्रॉफी धोनीच्या नावावर आहेत. हा कारनामा करणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. तसंच त्याच्या नावावर पाच आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम आहे. तसंच रोहित शर्माच्या नावावरही हा विक्रम नोंदवण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com